माजी नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाची तक्रार
By Admin | Updated: July 1, 2017 07:33 IST2017-07-01T07:33:29+5:302017-07-01T07:33:29+5:30
शिवसेनेचे माजी नगरसेवक हिराकांत फर्डे यांच्याविरुद्ध एका ३२ वर्षीय महिलेने विनयभंग केल्याची तक्रार केली आहे. दरम्यान

माजी नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाची तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शिवसेनेचे माजी नगरसेवक हिराकांत फर्डे यांच्याविरुद्ध एका ३२ वर्षीय महिलेने विनयभंग केल्याची तक्रार केली आहे. दरम्यान, या महिलेनेही आपल्याला मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिल्याची तक्रार फर्डे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात केली आहे.
फर्डे यांच्या पाचपाखाडी येथील आराधना सिनेमासमोरील वैतीवाडी येथील दुकानात ही महिला आणि त्यांची बहीण आनंद गृहसंकुलाची माहिती ही माहिती अधिकाराखाली घेण्यासाठी गेली होती. त्या वेळी फर्डे यांनी ते लेटर घेण्यास नकार देत शिवीगाळ करून बघून घेण्याची भाषा वापरून तोंडावर अॅसिड टाकण्याचीही धमकी देऊन आपले कपडे फाडून विनयभंग केल्याची तक्रार त्या महिलेने केली आहे. तसेच आपली आई आणि बहिणीलाही शिवीगाळ करून धमकी देऊन हाकलून दिल्याचा प्रकार २८ जून रोजी सायंकाळी घडल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, संबंधित महिला, तिची बहीण आणि आई आपल्या कार्यालयात विनापरवानगी शिरल्या. त्यांनी शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच त्यांच्या लेटरवर जबरदस्तीने सही करण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नकार देताच या महिलेने त्यांच्या डाव्या श्रीमुखात लगावली, अशी तक्रार फर्डे यांनी दाखल केली आहे. या दोन्ही गटांच्या तक्रारींचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.