गणेशोत्सव मंडळांना जुगार अड्ड्याचे स्वरूप
By Admin | Updated: September 23, 2015 04:18 IST2015-09-23T04:18:28+5:302015-09-23T04:18:28+5:30
गणेशोत्सव मंडळात जुगार खेळण्यावर पोलीसांनी बंदी घालूनही जागराणाच्या नावाखाली अनेक मंडळात जुगार खेळला जात आहे

गणेशोत्सव मंडळांना जुगार अड्ड्याचे स्वरूप
नवी मुंबई : गणेशोत्सव मंडळात जुगार खेळण्यावर पोलीसांनी बंदी घालूनही जागराणाच्या नावाखाली अनेक मंडळात जुगार खेळला जात आहे. अशा तिन मंडळावर पोलीसांच्या विशेष पथकाने सोमवारी रात्री छापा टाकून ५३ जुगारींना अटक केली आहे.
नवी मुंबई पोलीसांनी मागील चार महिण्यात शहरातील जुगार अड्डे बंद करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार परिमंडळ उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने अनेक जुगार अड्यांवर कारवाया केलेल्या आहेत. अनेक वर्षापासून ठिकठिकाणी चालणाऱ्या अड्यांवर कारवाया होवू लागल्याने अनेक जुगार चालक भुमीगत झाले आहेत. पोलीसांच्या या भुमीकेचे महिला वर्गाकडून आभार व्यक्त होत आहे. जुगार बंद झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर येण्यापासून वाचले आहेत. कारवाईच्या भीतीने अड्डे बंद असल्याने जुगार खेळण्याचे आदीन झालेल्यांना शहरात पर्याय उरलेला नाही. मात्र सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सवाचा आसरा काही जुगारी घेत आहेत. गणेशोत्सव मंडळामध्ये जागरणाच्या नावाखाली रात्रभर जुगार खेळला जात आहे. त्याठिकाणी रातोरात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. दिवसा खुर्ची उचलायलाही कार्यकर्ता नसलेल्या अशा काही मंडळात रात्री मात्र जुगारासाठी गर्दी जमलेली असते. त्यामुळे अशा काही गणेशोत्सव मंडळांना जुगार अड्याचे स्वरुप आले आहे.
उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली उपनिरिक्षक रोहन बगाडे यांच्या पथकाने सोमवारी रात्री अशा तिन मंडळांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये तुर्भे सेक्टर २१ येथील शिवराजे प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळात चाललेला जुगार उघड झाला. त्याठिकानी मंडळाच्या पदाधीकारयांसह जुगार खेळणारया २७ जणांवर पोलीसांनी कारवाई केली आहे. तर जुगारासाठी मांडलेली १ लाख ९३ हजार रुपयांची रक्कम त्याठिकाणावरुन जप्त केली आहे. त्याचप्रमाणे कोपरखैरणे सेक्टर १६ येथील मिनी मार्केटमधील फ्रेंड्स ग्रुप गणेशोत्सव मंडळावर पथकाने छापा टाकला. त्याठिकाणी जुगार खेळणारया १७ जुगारींवर कारवाई करुन जुगारासाठी मांडलेली २८ हजार ९५० रुपयांची रक्कम जप्त केली. हे मंडळ राजकीय पक्षाशी संबंधीत असून मंडळाच्या अध्यक्षाची पत्नी महापालिका निवडणुकीत उमेदवार होती.
पहाटेच्या सुमारास या पथकाने नेरुळ परिसरात धडक देवून सेक्टर १० मधील एल.आय.जी कॉलनीच्या जागृती गणेशोत्सव मंडळावर कारवाई केली. त्याठिकाणी जुगार खेळणाऱ्या ९ जुगारींवर कारवाई करुन ५५ हजार ४१० रुपयांची रोकड जप्त केली आहे. एका लोकप्रतीनिधीच वास्तव्य असलेल्या सोसायटीचे हे गणेशोत्सव मंडळ आहे. एका रात्रीत केलेल्या या तिन कारवायांमध्ये एकून ५३ जणांना अटक करुन त्यांच्याकडून २ लाख ७८ हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे.
या मंडळांवर कारवाई झालेली असली तरी शहरातील अशा इतरही काही मंडळांमध्ये रात्रीच्या वेळी जागरणाच्या नावाखाली जुगाराचे डाव मांडले जात आहेत. त्यामुळे प्रबोधनाचा वारसा असलेल्या गणेशोत्सवाला गालबोट लागत आहे.