नेरुळ-उरण रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याला वनविभागाचा खोडा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 11:19 PM2019-10-13T23:19:22+5:302019-10-13T23:20:00+5:30

भूसंपादनाचा तिढा : सिडको, रेल्वेचा पाठपुरावा सुरू; प्रकल्पाचा खर्च दोन हजार कोटींच्या घरात

Forest dept not ready for the second phase of the Nerul-Uran Railway? | नेरुळ-उरण रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याला वनविभागाचा खोडा?

नेरुळ-उरण रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याला वनविभागाचा खोडा?

googlenewsNext

नवी मुंबई : नेरुळ-उरण रेल्वेचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला झाला आहे. त्यामुळे खारकोपर ते उरणपर्यंतच्या दुसºया टप्प्याचे वेध आता या क्षेत्रातील रहिवाशांना लागले आहेत. दुसºया टप्प्याच्या कामात भूसंपादनाचा तिढा निर्माण झाला आहे; परंतु आता तोही काही प्रमाणात निकाली निघाल्याचा दावा सिडकोकडून केला जात आहे. असे असले तरी वनविभागाच्या जागेचा तिढा अद्याप कायम असल्याने दुसरा टप्पा रखडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


सिडकोने जुलै १९९७ मध्ये नेरुळ-उरण या २७ कि.मी. लांबीच्या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव तयार केला होता; परंतु विविध कारणांमुळे हा प्रकल्प कागदावरच सीमित राहिला होता. अखेर जून २०१२ पासून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. सिडको व रेल्वे यांच्या संयुक्त सहकार्याने हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. यात सिडकोचा ७७ तर रेल्वेचा ३३ टक्के खर्चाचा समभाग आहे. या संपूर्ण मार्गावर दहा स्थानके आहेत, तर या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च दोन हजार कोटींच्या घरात आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाची घोषणा झाली तेव्हा त्याचा खर्च ५०० कोटी रुपये निर्धारित करण्यात आला होता. या मार्गावरील सीवूड ते खारकोपरपर्यंतचा पहिला टप्पा ४ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर आता सिडको व रेल्वेने उरणपर्यंतच्या दुसºया टप्प्यावर लक्ष केंद्रित केले आहे. दुसरा टप्पा १५ कि.मी. लांबीचा आहे. यात गव्हाण, न्हावा-शेवा, रांजणपाडा, द्रोणागिरी आणि उरण या पाच स्थानकांचा समावेश आहे.


या स्थानकांचे कामही सध्या प्रगतिपथावर आहे. दुसºया टप्प्यात भूसंपादन आणि खारफुटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मार्गासाठी लागणारी चार हेक्टरची जागा वनविभागाची आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात खारफुटी असल्याने त्यासाठी पर्यावरण विभागाची मंजुरी लागणार आहे. त्या दृष्टीने सिडको आणि रेल्वेचा संयुक्तरीत्या पाठपुरावा सुरू आहे. हा प्रश्नही लवकरच निकाली निघेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. दरम्यान, वनविभागाच्या अखात्यारित असलेली जागा वगळून सिडको व रेल्वेने दुसºया टप्प्याच्या कामाला गती दिली आहे.


नवी मुंबईसह ठाणे ते पनवेलपर्यंत ट्रान्स हार्बर लोकल सेवेने जोडले गेले आहे. मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेने नवी मुंबईत येण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. नेरुळ-उरण ही स्वतंत्र लोकल मार्गिका असल्याने या परिसरातील प्रवाशांसाठी ती अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे.
या संपूर्ण प्रकल्पासाठी निर्धारित केलेल्या १८०० कोटी रुपये खर्चापैकी आतापर्यंत १५५० कोटी रुपये खर्च झाले आहेत, त्यामुळे उर्वरित टप्पा पूर्ण करण्यासाठी आणखी निधीची आवश्यकता लागणार असून त्यादृष्टीने रेल्वेकडून संबंधित विभाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे समजते.


तरघर स्थानकाची उपयुक्तता
शिवडी-न्हावा-शेवा सी-लिंक या प्रकल्पाला जोडला जाणारा कोस्टल रोड तरघर स्थानकाला लागूनच असलेल्या पामबीच मार्गाला जोडला जाणार आहे, तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील खांदेश्वर स्थानकापासून नियोजित तरघर स्थानकादरम्यान स्कायट्रेन सुरू करण्याची योजना आहे, त्यामुळे दक्षिण मुंबईतून नवी मुंबईत येण्यासाठी तरघर हे केंद्रबिंदू ठरणार आहे. या स्थानकाच्या उभारणीसाठी ११२ कोटी १२ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. बी. जी. बेलेकर कंपनीला हे कंत्राट दिले आहे. सध्या हे काम वेगाने सुरू आहे.

वनविभागाच्या ताब्यातील
जमिनीसाठी पाठपुरावा

नेरुळ-उरण या २७ कि.मी. लांबीच्या रेल्वेमार्गासाठी एकूण १४ हेक्टर खासगी मालकीची जमीन संपादित करावी लागली. यापैकी १३ हेक्टरचे संपादन पूर्ण करून ती रेल्वेच्या स्वाधीन करण्यात आली आहे. उर्वरित एक हेक्टर जागेसंदर्भात तडजोड सुरू असून, लवकरच हा प्रश्नही मार्गी लागेल. त्याचप्रमाणे वनविभागाच्या ताब्यातील चार एकर जमिनीसाठीही सिडको व रेल्वेचा संयुक्त पाठपुरावा सुरू असल्याचे समजते.

Web Title: Forest dept not ready for the second phase of the Nerul-Uran Railway?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.