दिवाळीच्या खरेदीसाठी फ्ली मार्केटची जत्रा
By Admin | Updated: October 14, 2016 06:26 IST2016-10-14T06:26:34+5:302016-10-14T06:26:34+5:30
दिवाळीनिमित्त खरेदीला चार चाँद लागावेत आणि रोजच्या गरजेच्या वस्तू, भेटवस्तू यासह सर्व खरेदी एकाच छताखाली उपलब्ध व्हावी, यासाठी कल्याणच्या मेट्रो जंक्शन मॉलमध्ये

दिवाळीच्या खरेदीसाठी फ्ली मार्केटची जत्रा
ठाणे : दिवाळीनिमित्त खरेदीला चार चाँद लागावेत आणि रोजच्या गरजेच्या वस्तू, भेटवस्तू यासह सर्व खरेदी एकाच छताखाली उपलब्ध व्हावी, यासाठी कल्याणच्या मेट्रो जंक्शन मॉलमध्ये विवा कॉन्सेप्ट शनिवारपासून ‘फ्ली मार्केट’ भरवत आहे. नाना प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीची लयलूट असलेल्या या मार्केटचे ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे.
या मार्केटमध्ये विशेष आकर्षक अशी विविध उत्पादने असतील. अगदी दैनंदिन जीवनातील गरजेच्या वस्तूंपासून ते दिवाळीच्या खरेदीपर्यंत सारे काही त्यात उपलब्ध असेल. गिफ्ट्स आणि महिलांसाठी फॅशन असेसरिज, अॅण्टीक उत्पादने त्यात पाहायला मिळतील. फोटोग्राफी, अभिनय, नृत्य, झुंबा, कला आणि हस्तकला यांचे प्राथमिक ज्ञान देणाऱ्या मोफत कार्यशाळाही तेथे असतील. येथे तरुण तसेच लहानांना नृत्यदिग्दर्शकांसमवेत नृत्याचा, अन्य कलांचा आस्वाद घेता येईल.
सेंट ज्युड्स शाळेच्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या वस्तूंची विक्रीही येथे होईल. महाराष्ट्राच्या विविध प्रांतांतील उत्पादनांबरोबर केरळ, जयपूर, काश्मीर, राजकोट, भागलपूर, आसाम यासारख्या इतर राज्यांतील उत्पादने पहिल्यांदाच कल्याणमध्ये यानिमित्ताने उपलब्ध होतील. होतकरू कलाकार आणि जे.जे. स्कूल आॅफ आर्टच्या माजी विद्यार्थ्यांनी तयार केलेली रेखाचित्रे, चित्रे आणि कोलाज यांचा सुंदर संग्रहही पाहता येईल. (प्रतिनिधी)