मुंबई, नागपूरसह पाच स्मार्ट सिटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2015 01:46 IST2015-04-28T01:46:19+5:302015-04-28T01:46:19+5:30
मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या शहरांना स्मार्ट सिटी बनविण्यासाठी इस्राइलमधील तेल अविव शहराचे सहकार्य मिळणार आहे.

मुंबई, नागपूरसह पाच स्मार्ट सिटी
मुंबई : मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या शहरांना स्मार्ट सिटी बनविण्यासाठी इस्राइलमधील तेल अविव शहराचे सहकार्य मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यासंदर्भात तेल अविवचे महापौर रान हुल्दाई यांच्याशी संयुक्त भागीदारीबाबत चर्चा केली.
शहरांचा सुनियोजित विकास साधण्यासाठी तंत्रज्ञान, समाज माध्यमे, लोकसहभाग आणि ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून स्मार्ट सिटी उभारण्याबाबत या वेळी चर्चा झाली. तेल अविव जगातील अव्वल अशी स्मार्ट
सिटी आहे. महाराष्ट्रातील महापालिकांनी राबविलेल्या चांगल्या योजनांचे आदानप्रदान करण्याचेही चर्चेत ठरले.
तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी इस्त्राइलचे माजी पंतप्रधान यित्झॅक राबिन यांच्या स्मारकाला भेट दिली. या वेळी तेल अविवचे महापौर रान हुल्दाई उपस्थित होते. वॉररूमलाही भेट देऊन संपूर्ण शहरावर देखरेख करणाऱ्या यंत्रणेची पाहणी केली. शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा व आपत्कालीन यंत्रणेची माहिती घेतली. यासोबतच मध्य-पूर्वेतील सर्वात मोठे शिंडर कॅन्सर हॉस्पिटल, तेल अविव विद्यापीठासह चेक पॉइंट व वेटिंट या सायबर कंपन्यांना भेटी दिल्या. तसेच तेल अविव विद्यापीठाचे प्रा. इराड यांच्याशीही चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले असता फ्रान्सच्या मदतीने नागपूरला स्मार्ट सिटी बनविण्याचा निर्णय झाला होता. आधी फ्रान्स आणि आता इस्राइलचे सहकार्य लाभणार असल्याने त्याचा सर्वाधिक लाभ नागपूरला होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
स्मार्ट सिटींमध्ये काय येणार?
आॅनलाइन
महापालिका सेवा
ई-सेवेद्वारे वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थापन
सुरक्षा आणि अत्यावश्यक सेवा हाताळण्याचे तंत्रज्ञान
तरुण उद्योजकांचा शहर विकासात सहभाग
पर्यावरणपूरक बांधकाम