महापालिकेत पाच प्राधिकरणे!
By Admin | Updated: June 2, 2016 01:41 IST2016-06-02T01:41:37+5:302016-06-02T01:41:37+5:30
प्रस्तावित पनवेल महापालिका कार्यक्षेत्रामध्ये सद्य:स्थितीमध्ये पाच प्राधिकरणे कार्यरत आहेत. नगरपालिका, सिडको, नैना, एमआयडीसी, एमएमआरडीए या महत्त्वाच्या संस्था असतानाही समन्व

महापालिकेत पाच प्राधिकरणे!
नामदेव मोरे, नवी मुंबई
प्रस्तावित पनवेल महापालिका कार्यक्षेत्रामध्ये सद्य:स्थितीमध्ये पाच प्राधिकरणे कार्यरत आहेत. नगरपालिका, सिडको, नैना, एमआयडीसी, एमएमआरडीए या महत्त्वाच्या संस्था असतानाही समन्वय व एकत्रित नियोजन नसल्याने परिसराचा विकास रखडला आहे. सहा लाख नागरिकांना पायाभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असून, या समस्या सोडविण्यासाठी महापालिका हाच एक प्रभावी पर्याय असल्याचे मत नागरिकही व्यक्त करू लागले आहेत.
ग्रामपंचायतीमधून थेट महापालिकेत रूपांतर झालेली नवी मुंबई ही देशातील एकमेव महापालिका. सिडको व ग्रामपंचायत या दोनच यंत्रणा असल्याने महापालिका बनविताना फारशी अडचणी आली नाही. परंतु राज्यातील पहिली नगरपालिका असणारे पनवेल मात्र अद्याप महापालिका होवू शकले नाही. वास्तविक प्रस्तावित पनवेल महापालिका कार्यक्षेत्रामध्ये शासनाची पाच प्रमुख प्राधिकरणे कार्यरत आहेत. शहराची जबाबदारी नगरपालिकेवर आहे. १२१७ हेक्टर परिसरामध्ये हे शहर वसले असून २०११ च्या जनगणनेनुसार नगरपालिका कार्यक्षेत्राची लोकसंख्या १ लाख ८० हजार आहे. परंतु १६४ वर्षे झाल्यानंतरही पालिकेचे उत्पन्न ३३ ते ३४ कोटी रुपयांचेच आहे. निधीअभावी अनेक महत्त्वाचे प्रकल्प उभे करता येत नाहीत. नगरपालिकेपेक्षा जास्त परिसर सिडको कार्यक्षेत्रामध्ये आहे. महापालिकेत समावेश असणाऱ्या २१ गावांमध्ये सिडको नियोजन प्राधिकरण म्हणून काम करत आहे. नोडचा विकास त्यांच्याकडे असला तरी या गावांच्या विकासाची जबाबदारी अद्याप ग्रामपंचायतींवरच आहे. ७५१९ हेक्टर परिसरात ३ लाख १२ हजार नागरिक रहात असून कररूपाने ३१ ते ३२ कोटी रुपये वसूल होत आहेत.
प्रस्तावित महापालिकेमध्ये नैना क्षेत्रामधील तब्बल ३६ गावांचा समावेश आहे. ६९९० हेक्टर परिसरामध्ये सद्य:स्थितीमध्ये ८५ हजार लोकसंख्या असली तरी भविष्यात सर्वाधिक विकास याच परिसरात होणार आहे. याशिवाय एमएमआरडीए क्षेत्रातील ११ गावे आणि तळोजा औद्योगिक वसाहतही महापालिकेत असणार आहे. पाच प्राधिकरणांच्या कार्यक्षेत्राचा महापालिकेत समावेश असणार आहे. आतापर्यंत ही सर्व प्राधिकरणे त्यांच्या क्षेत्रामधील विकासाचे नियोजन करत होते. यामुळे पनवेल तालुक्याचे शहरीकरण झाले तरी येथील पायाभूत सुविधा ग्रामीण परिसराप्रमाणेच होत्या. निधीचे विकेंद्रीकरण होत असल्याने पाणी, रस्ते, गटार, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य, मार्केट, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगल्या प्रकारे उपलब्ध नाही. १७९ चौरस किलोमीटर परिसरामध्ये २०११ च्या जनगणनेप्रमाणे ५ लाख ९५ हजार नागरिकांचे वास्तव्य आहे. गत चार वर्षांमध्ये लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सद्य:स्थितीमध्ये सर्वाधिक इमारतींचे काम या परिसरात सुरू असल्याने येथे वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढत आहे. वाढत्या नागरीकरणाला पायाभूत सुविधा देण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची गरज असल्यानेच शासनाने महापालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तळोजा एमआयडीसी
क्षेत्रफळ : ८६३ हेक्टर
औद्योगिक भूखंड : ९४९
व्यावसायिक भूखंड : १७
प्रकल्पग्रस्त भूखंड : १५१
निवासी भूखंड : २
शेड्स : २३०
नैना क्षेत्र
क्षेत्रफळ : ६९९० हेक्टर
लोकसंख्या : ८५३९४, उत्पन्न : १५३९५९३०४
सहभागी गावे : आदई, आकुर्ली, पाली देवद, देवद, विचुंबे, उसर्ली खुर्द, शिल्लोत्तर रायचुर, चिपळे, बोनशेत, विहीघर, चिखले, कोन, डेरवली, पळस्पे, कोळखे, शिवकर, कोप्रोली, केवाळे, नेरे, हरिग्राम, नितलस, खैरणे खुर्द, कानपोली, वलप, हेदुटने, पाले बुद्रुक, वाकडी, नेवाळी, उमरोली, आंबिवली, मोहो, नांदगाव, कुडावे, वडवली, तुरमाले, चिरवत.
क्षेत्रफळ : ७५१९ हेक्टर,
लोकसंख्या : ३१२२४९, उत्पन्न : ३१४०५९४१४
सहभागी गावे - तळोजे पाचनंद, काळुंद्रे, खारघर, ओवे, देविचापाडा, कामोठे, चाळ, नावडे, नावडेखार, तोंढरे, पेंधर, कळंबोली, काल्हेखार, आंबेतखार, रोडपाली, पडघे, वळवली, पाले खुर्द, टेंभोडे , आसुडगाव, खैरणे बुद्रुक.