सागरी सुरक्षेसाठी मच्छीमारांची सतर्कता महत्त्वाची

By Admin | Updated: December 12, 2015 01:50 IST2015-12-12T01:50:49+5:302015-12-12T01:50:49+5:30

सागरी सुरक्षेकरिता पोलिसांप्रमाणेच मच्छीमार बांधवांचीही सतर्कता महत्त्वाची असल्याचे मत पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी व्यक्त केले.

Fishermen's alert is important for maritime security | सागरी सुरक्षेसाठी मच्छीमारांची सतर्कता महत्त्वाची

सागरी सुरक्षेसाठी मच्छीमारांची सतर्कता महत्त्वाची

नवी मुंबई : सागरी सुरक्षेकरिता पोलिसांप्रमाणेच मच्छीमार बांधवांचीही सतर्कता महत्त्वाची असल्याचे मत पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी व्यक्त केले. सागरी सुरक्षा अभेद्य करण्याच्या उद्देशाने शुक्रवारी वाशी येथे सागर रक्षक दल, ग्रामरक्षक दल व पोलीस मित्र यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नवी मुंबईची सागरी सुरक्षा भक्कम असून प्रत्येक गैरहालचाल फेल करणारी उपाययोजना राबवली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईला लागूनच असलेल्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत ६० कि.मी.चा समुद्र किनारा व ४४ कि.मी.चा खाडी किनारा लाभलेला आहे. त्यापैकी १२ किनारे हे धोक्याची घंटा असून त्याठिकाणची सुरक्षा सदैव सतर्क ठेवण्यात आलेली आहे.
मुंबईवर हल्ला करण्यासाठी नवी मुंबई सागरी किनारा देखील वापरला जावू शकतो. यामुळे दुर्लक्षित असलेल्या जेट्टी व सागरी किनाऱ्यांच्याही सुरक्षेवर नवी मुंबईच्या विशेष शाखा पोलिसांनी भर दिलेला आहे. याकरिता मच्छीमार बांधवांनाही विश्वासात घेतले जात आहे. मासेमारीच्या निमित्ताने समुद्र अथवा खाडीमध्ये वावरत असलेल्या मच्छीमारांच्या निदर्शनास काही संशयास्पद हालचाली येवू शकतात. त्याचे गांभीर्य लक्षात घेवून ही बाब त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवल्यास गुन्हेगारांचा प्रयत्न हाणून पाडला जावू शकतो. याकरिता मच्छीमार बांधव, सागर रक्षक दल व ग्रामरक्षक दल यांचा मेळावा वाशीतील भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी मच्छीमार बांधव हे पोलिसांचे नाक, कान डोळे असल्याचे सांगितले.
सागरी सुरक्षा अभेद्य ठेवण्यासाठी पोलीस झटतच असतात. मात्र मच्छीमार बांधवांनी देखील याकामी पोलिसांना साथ दिल्यास कोणताही गैरप्रकार घडण्यापूर्वीच तो टळू शकतो असेही ते म्हणाले. गत महिन्यात विशेष शाखा पोलिसांनी सागर कवच अभियान राबवले होते. यामध्ये चाचणी स्वरूपात तीन सागरी हल्ले घडवण्यात आले. मात्र हे तीनही हल्ले सागरी पोलिसांनी फेल करुन आपली कार्यक्षमता सिध्द केल्याचे विशेष शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. सदर कार्यक्रमास अप्पर आयुक्त विजय चव्हाण, उपआयुक्त शहाजी उमाप, नौदलाचे अमोल जाधव, तटरक्षक दलाचे अंकित शर्मा, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Fishermen's alert is important for maritime security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.