घणसोली जेट्टीची लांबी वाढविण्याची मच्छीमारांची मागणी; गुडघाभर चिखलातून अर्धा कि.मी. चालत जाण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 01:26 IST2020-12-04T01:25:52+5:302020-12-04T01:26:06+5:30
घणसोली येथे बांधण्यात आलेली जेट्टी अर्धवट असल्यामुळे मच्छीमारांना मासळी सुकविणे, मासळी वाहतूक तसेच मासेमारीची जाळी घेऊन जाण्यासाठी अर्धा कि.मी.पर्यंत गुडघाभर चिखलाच्या गाळातून मार्ग काढत जावे लागते.

घणसोली जेट्टीची लांबी वाढविण्याची मच्छीमारांची मागणी; गुडघाभर चिखलातून अर्धा कि.मी. चालत जाण्याची वेळ
अनंत पाटील
नवी मुंबई : पारंपरिक मासेमारी व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांसाठी नवी मुंबईत अनेक ठिकाणी खाडीकिनारी मेरीटाइम बोर्डाने लाखो रुपये खर्चून जेट्टी उभारलेल्या आहेत. मात्र घणसोली खाडीकिनारी असलेल्या जेट्टीचे काम अर्धवट अवस्थेत आहे. त्यासाठी या जेट्टीची लांबी वाढविण्याची मागणी घणसोली गावच्या मच्छीमारांनी केली आहे.
नवी मुंबईत गावठाण क्षेत्रात सर्वाधिक मोठी लोकसंख्या असलेला गाव म्हणून घणसोली गावची ओळख आहे. शेती आणि मासेमारी हा पूर्वी आगरी-कोळी समाजाचा पारंपरिक व्यवसाय होता. मात्र शहराचा विकास झपाट्याने होत गेल्याने शासनामार्फत सिडकोने येथील प्रकल्पग्रस्तांच्या शेतजमिनी मातीमोल भावाने विकत घेतल्या. त्यामुळे शेतीच्या व्यवसायाला कायमचा पूर्णविराम लाभला. ठाणे, बेलापूर पट्टीतील अनेक लहान-मोठे कारखाने बंद पडल्याने बेरोजगारी आली. मात्र पूर्वीपासून मासेमारी करणारे मच्छीमार आजही मासेमारी व्यवसाय करून कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहेत. आणि त्यासाठी नवी मुंबईतील मासेमारी व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांसाठी खाडीकिनारी मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्चून जेट्टी बांधण्यात आल्या.
घणसोली येथे बांधण्यात आलेली जेट्टी अर्धवट असल्यामुळे मच्छीमारांना मासळी सुकविणे, मासळी वाहतूक तसेच मासेमारीची जाळी घेऊन जाण्यासाठी अर्धा कि.मी.पर्यंत गुडघाभर चिखलाच्या गाळातून मार्ग काढत जावे लागते. अनेकदा मच्छीमारांच्या पायाला रुग्णालयातील जैविक कचऱ्यातील सुया, इंजेक्शन, घातक औषधांच्या बाटल्यांच्या काचा लागून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी सरकारने मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून जेट्टीचे अर्धवट काम पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चून आतापर्यंत दिवाळे गाव, सारसोळे, वाशी, घणसोली, ऐरोली - दिवा कोळीवाडा, आणि तळवली येथे लहान-मोठ्या जेट्ट्या बांधण्यात आलेल्या आहेत. घणसोली येथील अर्धवट असलेल्या जेट्टीची लांबी २६५ मीटरपर्यंत वाढविण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. - दिलीप हासू पाटील, अध्यक्ष, चेरेदेव मच्छीमार संघटना, घणसोली.