‘त्या’ आगीस व्यवस्थापनच जबाबदार
By Admin | Updated: December 25, 2015 02:38 IST2015-12-25T02:38:42+5:302015-12-25T02:38:42+5:30
पनवेल बसस्थानकासमोरील दुकानाला गेल्या महिन्यात लागलेल्या आगीत बिकानेर स्वीट कॉर्नरच जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले आहे

‘त्या’ आगीस व्यवस्थापनच जबाबदार
पनवेल : पनवेल बसस्थानकासमोरील दुकानाला गेल्या महिन्यात लागलेल्या आगीत बिकानेर स्वीट कॉर्नरच जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. जुन्या वीज वायर, वीज जोडणीत बिघाड असल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा अहवाल पेण येथील विद्युत निरीक्षकांनी सादर केला आहे. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्यात संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे बाजूच्या मिलेनियम जम्बो झेरॉक्स दुकानाचे मोठे नुकसान झाले. या जळीत नुकसानभरपाईची जबाबदारी बिकानेरच्या मालकाची असल्याचे अहवालात नमूद आहे.
पनवेलमधील साई आॅर्केड इमारतीतील डी विंगमध्ये असलेल्या बिकानेर कॉर्नरवरील मिठाईच्या दुकानाला ५ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली होती. बाहेर दिवाळीनिमित्त मंडप बांधला असल्याने मंडपाच्या कपड्याने त्वरित पेट घेतला. या आगीत बिकानेर कॉर्नरसह बाजूचे मिलेनियम झेरॉक्सचे दुकान खाक झाले होते. येथील मशिन जळाल्या. यामध्ये मिलेनियम झेरॉक्सचे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले.
त्यानंतर पोलिसांनी पेण येथील विद्युत निरीक्षण विभागाकडून अहवाल मागितला होता. त्यानुसार या कार्यालयाकडून जळीत अपघाताची चौकशी केली. घटनास्थळाचे प्रत्यक्ष निरीक्षणावरून विद्युत निरीक्षकांनी निष्कर्ष काढला आहे. (प्रतिनिधी)