स्पॅगेटीतील अग्निशमन यंत्रणा धूळखात
By Admin | Updated: February 10, 2016 03:15 IST2016-02-10T03:15:20+5:302016-02-10T03:15:20+5:30
खारघरमधील इमारतीला लागलेल्या आगीमुळे सिडकोची अग्निशमन यंत्रणा तोकडी असल्याचे उघड झाले आहे. त्यातच सिडकोने जे गृहनिर्माण प्रकल्प उभारले आहेत त्यात अग्नी सुरक्षेबाबत

स्पॅगेटीतील अग्निशमन यंत्रणा धूळखात
- वैभव गायकर, पनवेल
खारघरमधील इमारतीला लागलेल्या आगीमुळे सिडकोची अग्निशमन यंत्रणा तोकडी असल्याचे उघड झाले आहे. त्यातच सिडकोने जे गृहनिर्माण प्रकल्प उभारले आहेत त्यात अग्नी सुरक्षेबाबत पुरेशा उपाययोजना नसल्याचे दिसून येत आहे. खारघरच्या स्पॅगेटी सोसायटीतील अग्निशमन यंत्रणा धूळखात पडली आहे. ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर सोसायटीकडे वर्ग करण्यात आलेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही सिडकोच्या याकडे दुर्लक्ष करीत आहे.
सर्वसामान्यांना परवडणारी घरे सिडकोने नवीन पनवेल आणि कळंबोली नोडनंतर खारघरला बांधली. वेगवेगळ्या टाईपची घरे सोडत पद्धतीने ग्राहकांना देण्यात आली. त्यामध्ये स्पॅगेटीचा या गृहनिर्माण संकुलाचा समावेश आहे. सिडकोने स्वस्तात घरे दिल्याचा कांगवा करीत आपली छाती बडवून घेतली असली तरी बांधकाम किती दर्जेदार आहे, त्याचबरोबर पायाभूत सुविधा किती आणि कशा आहेत, हे मुद्दे वादाचे ठरतात. येथील रहिवासी अनेक कारणांमुळे त्रस्त आहेत. त्यामध्ये पाणी, रस्ते, गटार, त्याचबरोबर पावसाळ्यातील लिकेजचा समावेश आहे. इतकेच काय तर स्पॅगेटीची निर्मिती करताना सिडकोने चार सोसायट्यांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविली. मात्र ही यंत्रणा अद्याप कार्यान्वित केली नसल्याची तक्र ार येथील रहिवाशांची आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही सिडको दुर्लक्ष करीत आहे. या सोसायट्यांमध्ये सात मजली सुमारे ५० इमारती आहेत. १ आरके, १ आणि २ बीएचके १,७५६ सदनिका आहेत. सहा हजारांच्या आसपास लोकवस्ती असलेली स्पॅगेटी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याने असुरक्षित आहे. त्यामुळे गिरीराज हॉरिझोन इमारतीमधील आगीसारखी एखादी दुर्घटना घडली, तर अग्मिशमन बंब येईपर्यंत कोणताही पर्याय येथील रहिवाशांकडे नाही. सोसायट्यांना भोगवटा प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षांपासून अर्ज आणि विनंत्यांचा सिलसिला सुरू आहे. कित्येकदा याविषयी बैठकाही झाल्या तरीसुद्धा परिस्थिती जैसे थे आहे. वसाहतीत वारंवार होणाऱ्या आगीच्या घटनांचा विचार करता स्पॅगेटीत अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित होणे आवश्यक आहे. सिडको ही यंत्रणा सोसायटीकडे सुद्धा देण्यास राजी नसल्याचे स्पॅगेटी को-आॅप. हौसिंग सोसायटीचे सचिव यशवंत देशपांडे यांनी सांगितले. आगामी काळात येथे एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार सिडकोच असेल, असे मतही देशपांडे यांनी व्यक्त केले.
आम्ही मागील सहा ते सात वर्षांपासून सिडकोशी पत्रव्यवहार करीत आहोत, तरीदेखील सिडको याबाबत काहीच निर्णय घेत नाही. एखादी मोठी घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येईल का?
- नितीन बाविस्कर, सचिव, पारिजात को-आॅप. सोसायटी
यासंदर्भात अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या यंत्रणेची पाहणी करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. अग्निशमन विभाग चाचण्या घेऊन त्याचे टेस्ट रिपोर्ट आल्यानंतर सिडको संबंधित सोसायट्यांना ही यंत्रणा हस्तांतरित करेल. - प्रदीप डहाके, प्रशासक खारघर नोड, सिडको