पावणेमध्ये फायबर कंपनीला आग
By Admin | Updated: March 5, 2017 03:00 IST2017-03-05T03:00:36+5:302017-03-05T03:00:36+5:30
पावणे एमआयडीसी येथील पॉलिकॅब कंपनीला आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या भीषण आगीमध्ये कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली असून, शनिवारी

पावणेमध्ये फायबर कंपनीला आग
नवी मुंबई : पावणे एमआयडीसी येथील पॉलिकॅब कंपनीला आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या भीषण आगीमध्ये कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली असून, शनिवारी पहाटेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. तर कामगारांच्या साप्ताहिक सुटीमुळे कंपनी बंद असल्यामुळे जीवितहानी टळली आहे.
शुक्रवारी, मध्यरात्री ११ वाजण्याच्या सुमारास पॉलिकॅब कंपनीमध्ये आग लागल्याची घटना घडली. सदर कंपनीत फायबरपासून फायबरच्या शिट बनवण्याचे काम केले जायचे. यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायबर व रसायनांचा साठा होता. आगीमुळे या फायबर शिटच्या साठ्याने पेट घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर तयार झाला होता. आगीमुळे तयार झालेला हा धूर लगतच्याच रहिवासी क्षेत्रात पसरला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, एमआयडीसीच्या पावणे अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवाय आग मोठी असल्यामुळे त्यांनी पालिकेच्याही अग्निशमन दलाला मदतीसाठी बोलावले. यामुळे वाशी, ऐरोली व नेरुळ येथील अग्निशमन दलाचे बंबही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी फोम व पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. कंपनीपासून काही अंतरावरील रहिवासी चाळींनाही आगीपासून धोका निर्माण झाला होता. त्यामुळे अनेकांनी भीतीपोटी घराबाहेर पळ काढला होता. अखेर अग्निशमन दलाच्या तीन तासांच्या प्रयत्नानंतर मध्यरात्री २:३० वाजण्याच्या सुमारास आग नियंत्रणात आली. तर पहाटे ४ वाजेपर्यंत त्या ठिकाणी कुलिंगचे काम सुरू होते. या आगीचे कारण मात्र अद्याप कळले नसल्याचे पावणे अग्निशमन केंद्राचे अधिकारी सुरेंद्र चौधरी यांनी सांगितले. शुक्रवारी कामगारांची साप्ताहिक सुटी असल्यामुळे घटने वेळी कंपनीत कामगार नव्हते. यामुळे जीवितहानी टळल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, परिसरातच एका लग्नाची वरात सुरू होती. त्यामध्ये वाजवण्यात आलेल्या फटाक्यांच्या ठिणगीमुळे कंपनीला आग लागल्याची शक्यता परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. आगीमध्ये कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)