ऑनलाईन ट्रान्सपोर्टर शोधणे पडले महागात; कंपनीची ४ लाख ६५ हजाराची फसवणूक
By सूर्यकांत वाघमारे | Updated: October 11, 2023 17:49 IST2023-10-11T17:49:33+5:302023-10-11T17:49:40+5:30
कंपनीचे साहित्य पाठवण्यासाठी ऑनलाईन ट्रान्सपोर्टरचा नंबर शोधणे चांगलेच महागात पडले आहे.

ऑनलाईन ट्रान्सपोर्टर शोधणे पडले महागात; कंपनीची ४ लाख ६५ हजाराची फसवणूक
नवी मुंबई : कंपनीचे साहित्य पाठवण्यासाठी ऑनलाईन ट्रान्सपोर्टरचा नंबर शोधणे चांगलेच महागात पडले आहे. अज्ञाताने कामाचे कोटेशन देऊन ४ लाख ६५ हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे. हा प्रकार निदर्शनात आल्यानंतर कंपनीच्या तक्रारीवरून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुर्भे एमआयडीसी मधील डिझेल, पेट्रोल रिफायनरी कंपन्यांचे टॅंक साफ करणाऱ्या कंपनीसोबत हा प्रकार घडला आहे. कंपनीच्या कामासाठी लागणारे साहित्य मथुरा येथून चेन्नईला पाठवले जाणार होते. यासाठी कंपनीचे मॅनेजर विश्वनाथ सिंग यांनी ऑनलाईन ट्रान्सपोर्टर कंपनीचा नंबर शोधला होता. त्यानंतर काही वेळातच त्यांना एका व्यक्तीने संपर्क करून माहिती घेऊन कामाचे कोटेशन पाठवले होते.
मात्र साहित्य पाठवण्यापूर्वी संपूर्ण रक्कम भरणे आवश्यक असल्याचेही सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून सिंग यांनी कंपनीच्या खात्यातून अडीच लाख रुपये पाठवले होते. यानंतर पुन्हा पैशाची मागणी झाली असता त्यांनी पुन्हा संबंधितांच्या खात्यावर पैसे पाठवले. मात्र ४ लाख ६५ हजार रुपये पाठवून देखील पैसे मिळाले नसल्याचे संबंधितांकडून सांगितले जात होते. अखेर आपली फसवणूक होत असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. यामुळे झालेल्या फसवणूक प्रकरणी त्यांनी तुर्भे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली असता मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.