खारघर दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करा; विरोधी पक्षनेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 24, 2023 19:19 IST2023-04-24T19:19:26+5:302023-04-24T19:19:36+5:30
खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान उष्माघात व पाण्याविना झालेल्या धावपळीत चेंगराचेंगरी होऊन घटनास्थळी व उपचार दरम्यान १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

खारघर दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करा; विरोधी पक्षनेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
नवी मुंबई : खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी संतोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिस आयुक्तांकडे आणि राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे. यासाठी दानवे यांनी सोमवारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली.
खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान उष्माघात व पाण्याविना झालेल्या धावपळीत चेंगराचेंगरी होऊन घटनास्थळी व उपचार दरम्यान १४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या शासकीय सोहळ्याला गालबोट लागले असून घडलेल्या दुर्घटनेला शासनाला जबाबदार धरले जात आहे. त्यानुसार हि दुर्घटना मानवनिर्मित असल्याने आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे याची केली आहे. या मागणीसाठी दानवे यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची देखील भेट घेतली. यावेळी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, द्वारकानाथ भोईर, बबन पाटील आदी उपस्थित होते.
राज्यात तापमान वाढत असतानाही मोठ्या प्रमाणात नागरिकांना एकत्र करून त्यांच्या जीवाशी खेळ झालेला आहे. तर कोट्यवधी रुपये खर्च करूनही जमणाऱ्या नागरिकांना मात्र मंडपाविना उन्हात बसवून आवश्यक सुविधा देखील पुरवल्या नसल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे या दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी पोलिस आयुक्तांना दिले.