राष्ट्रवादी-भाजपा कार्यकर्त्यांत मारामारी
By Admin | Updated: March 19, 2015 00:10 IST2015-03-19T00:10:18+5:302015-03-19T00:10:18+5:30
दिघा येथे सुरू असलेल्या सर्व्हेबाबत चौकशी केल्यावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक व भाजपचे कार्यकर्ते यांच्यात मारामारी झाली.

राष्ट्रवादी-भाजपा कार्यकर्त्यांत मारामारी
नवी मुंबई : दिघा येथे सुरू असलेल्या सर्व्हेबाबत चौकशी केल्यावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक व भाजपचे कार्यकर्ते यांच्यात मारामारी झाली. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांनी एकमेकांविरोधात तक्रार केली आहे.
दिघा एमआयडीसी येथे मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. तेथे असलेल्या झोपड्यांमध्ये काही लोक सर्वेक्षण करत होते. भाजपचे स्थानिक कार्यकर्ते हरेष पांडेय यांनी त्यांच्याकडे सर्वेबाबत चौकशी केली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे सर्वेक्षण होत असल्याने त्यामागे राजकीय हेतूची शक्यता होती. त्यामुळे एमआयडीसीतर्फे सर्व्हे होत असल्यास त्याचे पुरावे दाखवावे, अशीही मागणी त्यांनी केली. यावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक नवीन गवते व पांडेय यांच्यात भांडण होऊन मारामारी झाली. या प्रकारात गवते यांचे सहकारी शिक्षण मंडळ उपसभापती वीरेश सिंग यांनी स्वत:कडील पिस्तूल देखील आपल्यावर रोखल्याचे पांडेय यांचे म्हणणे आहे. मात्र याप्रकरणी गवते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही. या मारहाणप्रकरणी गवते व पांडेय यांनी एकमेकांविरोधात रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)