दारू अड्ड्यांवर धाडसत्र
By Admin | Updated: December 17, 2015 02:01 IST2015-12-17T02:01:29+5:302015-12-17T02:01:29+5:30
शहरातील जुगारासह मटक्याचे अड्डे बंद केल्यानंतर पोलिसांनी चायनीज सेंटर व दारू विक्रीच्या दुकानाबाहेर मद्यप्राशन करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. मद्य विक्रेत्यांसह

दारू अड्ड्यांवर धाडसत्र
- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
शहरातील जुगारासह मटक्याचे अड्डे बंद केल्यानंतर पोलिसांनी चायनीज सेंटर व दारू विक्रीच्या दुकानाबाहेर मद्यप्राशन करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. मद्य विक्रेत्यांसह पिणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत दोन ठिकाणी धाडी टाकून ३५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. परिमंडळ एकचे उपायुक्त शहापी उमाप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बहुतांश सर्व जुगार व मटक्याचे अड्डे बंद केले आहेत. उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहन बगाडे व इतर कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार केले आहे. या पथकाने केलेल्या कारवाईमुळे आयुक्तालयाची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच सर्व जुगार अड्डे बंद झाले आहेत.
शहरात बहुतांश बियर शॉपी, दारू विक्री दुकानाच्या बाहेरच बिनधास्तपणे मद्यपान सुरू असते. रेल्वे स्टेशन व अनेक रहदारीच्या ठिकाणी दारू विक्रीची दुकाने असून मद्यपींचा नागरिकांना विशेषत: महिलांना त्रास होवू लागला आहे. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेवून पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी ऐरोली सेक्टर २० मधील शालीन बिअर शॉपच्या बाजूच्या शेडमध्ये दारू अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून ७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. १२ डिसेंबरला दिघामधील ईश्वर नगर परिसरात धाड टाकून मद्य पिणारे २५ व विकणाऱ्या तिघांवर कारवाई केली आहे. सदर ठिकाणावरून २२० दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी पंधरा दिवसांमध्ये तब्बल ३५ जणांवर कारवाई केल्यामुळे उघड्यावर दारू विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अनेकांनी कारवाईपासून सुटका व्हावी यासाठी दुकानाच्या दर्शनी भागात दुकानासमोर दारू पिण्यास मनाई असल्याची पाटी लावली आहे. परंतु अशी पाटी लावली असली तरी प्रत्यक्षात मात्र दारू पिणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे प्रकार सुरूच आहे. बियर शॉपच्या मालकांनी दुकानाबाहेर दारूच्या जाहिरातीच्या कमानी तयार केल्या असून त्याठिकाणी मद्यप्राशन सुरू असते. नेरूळ, शिरवणे, जुहूगाव, कोपरखैरणे, घणसोली व इतर ठिकाणीही चायनीज सेंटरवर बिनधास्तपणे मद्यविक्री सुरू असते. या सर्व अड्ड्यांवर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनीही अशाप्रकारचे अवैध व्यवसाय कुठे सुरू असतील तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन केले आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांवरही कारवाई
उघड्यावर मद्यप्राशन सुरू असताना स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारीही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. नेरूळ रेल्वे स्टेशन, एपीएमसी व इतर अनेक ठिकाणी नागरिकांनी तक्रारी करूनही पोलिसांनी दखल घेतलेली नाही. नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कारवाई करावी अशी लेखी तक्रार पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी केली असून बियर शॉपीवाल्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली आहे.
शहरातील बियर शॉप चालकांना बियर विकण्याचा परवाना आहे. परंतु अनेकांनी दुकानाबाहेर शेड तयार करून तेथेच मद्यप्राशन करण्यास परवानगी दिली आहे. उघड्यावर दारू, बियर पिणे कायद्याने गुन्हा असून कुठेही अशाप्रकारचा प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ कारवाई केली जाणार आहे.
- शहाजी उमाप,
पोलीस उपआयुक्त, परिमंडळ १