सिडकोविरोधात लढा तीव्र करणार
By Admin | Updated: August 13, 2015 23:21 IST2015-08-13T23:21:58+5:302015-08-13T23:21:58+5:30
सिडकोने हाती घेतलेल्या पहिल्या टप्प्यातील अनधिकृत बांधकामाच्या तोडक मोहिमेला खारघरमधून तीव्र विरोध होत आहे. याविरोधातील लढा आणखी तीव्र करून प्रकल्पग्रस्तांची बाजू सिडकोसमोर मांडू

सिडकोविरोधात लढा तीव्र करणार
पनवेल : सिडकोने हाती घेतलेल्या पहिल्या टप्प्यातील अनधिकृत बांधकामाच्या तोडक मोहिमेला खारघरमधून तीव्र विरोध होत आहे. याविरोधातील लढा आणखी तीव्र करून प्रकल्पग्रस्तांची बाजू सिडकोसमोर मांडू, असा निर्धार शेकापने गुरु वारी खारघरमध्ये आयोजित केलेल्या निषेध मोर्चात केला.
बुधवारी खारघरमधील मुर्बी गावातील दत्तू जानू ठाकूर या प्रकल्पग्रस्ताचे गरजेपोटी बांधलेले घर सिडकोने जमीनदोस्त करून शेकाप नेते बाळाराम पाटील यांच्यासह ग्रामस्थांना अटक केली होती. त्याच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चात पनवेल तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते परिसरातील महिला, युवकांचा मोठा सहभाग होता. शेकापने छेडलेल्या या मोर्चाला काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेना आदी पक्षांनी पाठिंबा दर्शविला.
नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वाढत आहे. मात्र सिडकोकडून केवळ प्रकल्पग्रस्तांच्याच घरांवर कारवाई करण्यात येत आहे, असा प्रश्न यावेळी प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावरही अनेकांनी टीका केली.
माजी आमदार विवेक पाटील यांनी सिडकोविरोधातील लढा आणखी तीव्र करण्याची गरज असल्याचे सांगत प्रत्येक गावांमध्ये बैठका घेऊन सिडकोविरोधात एकवटण्याची गरज असल्याचे सांगितले. ज्या ज्या प्रकल्पग्रस्तांना सिडकोने नोटिसा बजावल्या आहेत त्यांनी प्रकल्पग्रस्तांनी शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल कार्यालयामध्ये आपली कागदपत्रे जमा करावीत, ती कागदपत्रे पडताळून सिडकोला त्याची माहिती देऊन सिडकोसमोर आपली बाजू मांडली जाईल, असे स्पष्ट केले. शेतकरी कामगार पक्षासमोर सध्या एकच कार्यक्र म असून प्रकल्पग्रस्तांची घरे वाचविणे यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले. खारघर सेक्टर २० मधील या निषेध मोर्चामध्ये शेकापचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, काँग्रेसचे सुदाम पाटील, सुनील सावर्डेकर आदींसह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)