गुणवंत माथाडी कामगारांचा सत्कार
By Admin | Updated: September 26, 2015 01:22 IST2015-09-26T01:22:12+5:302015-09-26T01:22:12+5:30
आयुष्यभर ओझी वाहणाऱ्या माथाडी कामगारांना प्रत्येक वर्षी अण्णासाहेब पाटील जयंतीदिवशी माथाडी भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात येते.

गुणवंत माथाडी कामगारांचा सत्कार
नवी मुंबई : आयुष्यभर ओझी वाहणाऱ्या माथाडी कामगारांना प्रत्येक वर्षी अण्णासाहेब पाटील जयंतीदिवशी माथाडी भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात येते. यावर्षी राज्यभरातील १४ कामगारांना हा पुरस्कार दिला असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्यावतीने दरवर्षी एपीएमसी मार्केटमध्ये अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त कामगार मेळाव्याचे आयोजन केले जाते. माथाडी कायद्याचे जनक म्हणून ओळख असणाऱ्या अण्णासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारो कामगार मुंबईत येतात. यंदा शिवाजी शेळके, मानकीबाई धर्मा मिठागरी, भगवान भागोजी वशिवले, भगवान शंकर साळुंखे, पितांबर तुलशीराम पाटील, गजानन बाबाजी थोरात, भिका सैदाने, विठ्ठल बंडू घोलप, उत्तम गोविंद पिसाळ, राजू ईसाक सय्यद, हणमंत कृष्णा मरगजे, ऋषिकेश भीमराव सातकर, आसाराम दादा गोविंद व भाऊसाहेब जाधव यांना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.
मराठा महासंघाचे अॅड. शशिकांत पवार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनीही आम्ही नेहमीच कामगारांच्या सोबत असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)