चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच
By Admin | Updated: September 3, 2015 23:34 IST2015-09-03T23:34:17+5:302015-09-03T23:34:17+5:30
आदिवासी वसतिगृहातील ३०९ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ खांदा वसाहतीतील वसतिगृहात विद्यार्थ्यांनी ३१ आॅगस्टपासून आमरण

चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच
पनवेल : आदिवासी वसतिगृहातील ३०९ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ खांदा वसाहतीतील वसतिगृहात विद्यार्थ्यांनी ३१ आॅगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र अद्याप तोडगा न निघाल्याने गुरुवारी चौथ्या दिवशीही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच होते.
ठाणे अपर आयुक्तालयांर्गत येणाऱ्या ८७ वसतिगृहांपैकी पेण येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात शेकडो विद्यार्थ्यांनी मोर्चा नेला होता. वारंवार पत्रव्यवहार करूनही वसतिगृहांत व विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण होत नाही. त्यामुळे जवळपास ३५० विद्यार्थ्यांनी पेण प्रकल्प कार्यालयात स्वत: ला कोंडून घेतले होते. यावेळी प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांनी शैक्षणिक समस्यांचा विचार न करता, गुन्हे दाखल केल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. आमरण उपोषणाचे हत्यार उगारत, प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडेंवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
तिसऱ्या दिवशी सहा विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना पनवेल ग्रामीण रु ग्णालय, जेजे व केईएम रु ग्णालयात दाखल करण्यात आले. चार दिवस होवूनही आदिवासी विकास मंत्रालयाच्या वतीने विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी यावेळी केला आहे. आदिवासी विकास विभागाचे ठाण्याचे उपायुक्त किरण माळी यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची भेट घेतली असली तरी यातून काहीही निष्पन्न झाले नसल्याचे विद्यार्थी प्रतिनिधींनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)