मोदींनी फसवल्याने शेतकऱ्यांची शिवसेनेकडे धाव
By Admin | Updated: March 4, 2015 02:28 IST2015-03-04T02:28:17+5:302015-03-04T02:28:17+5:30
न्हावा-शेवा परिसरातील नागरिकांची केंद्रातील मोदी सरकारने घोर फसवणूक केल्याचा आरोप गावकऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केला.
मोदींनी फसवल्याने शेतकऱ्यांची शिवसेनेकडे धाव
मुंबई : न्हावा-शेवा परिसरातील नागरिकांची केंद्रातील मोदी सरकारने घोर फसवणूक केल्याचा आरोप गावकऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केला. निवडणुकीपूर्वी मोदी यांनी जेएनपीटीकरिता ज्यांनी जमिनी दिल्या त्यांना तातडीने भूखंड देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात भूखंडवाटपाची पत्रे देण्यात आली. मात्र भूखंडाचा ताबा देण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिल्याने ठाकरे यांची भेट घेतल्याचे सांगितले.
जेएनपीटी बंदराकरिता रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने जमिनी विकत घेण्यात आल्या होत्या. मोबदल्यात शेतकऱ्यांना साडेबारा टक्क्यांतून भूखंड देण्याची अट होती. मात्र २५ वर्षांत त्याबाबत सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही. मोदी प्रचाराकरिता आले असताना त्यांनी हा अन्याय दूर करण्याचा शब्द दिला होता. १५ आॅगस्ट रोजी एका कार्यक्रमात जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांनी भूखंडवाटपाची पत्रे दिली. त्या पत्रावर जेएनपीटी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. भूखंड मिळावा याकरिता प्रकल्पग्रस्तांनी जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली तेव्हा हे भूखंडवाटप चुकीचे असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
पंतप्रधान मोदी यांनी खोटी पत्रे देऊन आमची फसवणूक केली, असा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला.
आमच्या भूखंडापैकी साडेबारा टक्के भूखंड मिळावा याकरिता पाठपुरावा करण्याची मागणी त्यांनी ठाकरे यांच्याकडे केली. (विशेष प्रतिनिधी)