पनवेल मधील भात विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी; 789 शेतकऱ्यांच्या मार्फत 9765 क्विंटल भात जमा
By वैभव गायकर | Updated: January 5, 2024 16:21 IST2024-01-05T16:19:42+5:302024-01-05T16:21:16+5:30
तालुक्यात शेतकरी सहकारी खरेदी-विक्री केंद्र पनवेल मार्केट यार्ड येथे पनवेल उरण या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे.

पनवेल मधील भात विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी; 789 शेतकऱ्यांच्या मार्फत 9765 क्विंटल भात जमा
वैभव गायकर
पनवेल : तालुक्यात शेतकरी सहकारी खरेदी-विक्री केंद्र पनवेल मार्केट यार्ड येथे पनवेल उरण या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. मोठ्या प्रमाणात भात खरेदी करून ठेवण्यास गोदामे अपुरी पडत असल्याने भात खरेदीला मर्यादा आल्या आहेत.या केंद्रात 9765 क्विंटल भात अद्याप पर्यंत गोळा झाला आहे.
नोंदणी केलेल्या 1132 शेतकऱ्यांपैकी 789 शेतकऱ्यांनी आपला भात या केंद्रात जमा केला आहे.होणारी गर्दी टाळण्यासाठी क्रमाक्रमाने शेतकऱ्यांना या केंद्रावर बोलाविण्यात येत आहे.यंदा देखील मुसळधार पावसाचा फटका काही शेतकऱ्यांना बसला असल्याने भाताचे उत्पादन घटले आहे.यंदा शासनातर्फे 2183 रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला आहे.मागील वर्षी हा भाव 2040 रुपये एवढा होता.789 शेतकऱ्यांमध्ये उरणचे 240 आणि पनवेलच्या 549 शेतकऱ्यांचा समावेश आहे.मागील वर्षी 31385 क्विंटल भाताचे उत्पादन झाले होते.अतिवृष्टीमुळे यंदा भाताचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.मात्र अद्यापही शेतक-यांच्या माध्यमातून भात विक्री शिल्लक असल्याने नेमका किती भाताचे उत्पादन घटले हे शेवटी समजणार आहे.शासनाने यावर्षी चांगला भाव देऊ केला आहे मात्र अतिवृष्टीमुळे तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती शेतकरी चंद्रकांत भगत यांनी दिली.
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत.यावर्षी 1132 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असुन टप्प्याटप्प्याने या शेतकऱ्यांकडून भात खरेदी केली जात आहे.
- रवींद्र पाटील (चेअरमन,सहकारी भात खरेदी केंद्र ,पनवेल )