सभापतीच्या गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट; पोलिसांकडून कारवाई नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 01:47 IST2021-02-12T01:46:50+5:302021-02-12T01:47:16+5:30
कार्यक्रमाला उपस्थित महिला व बालकल्याण समिती सभापतीच्या गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट होती. मात्र, पोलिसांनी गाडीवर कारवाई केली नाही.

सभापतीच्या गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट; पोलिसांकडून कारवाई नाही
नवीन पनवेल : रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वन डे विथ पोलीस हा कार्यक्रम पनवेल महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी नवीन पनवेल ट्रॅफिक सिग्नल येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित महिला व बालकल्याण समिती सभापतीच्या गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट होती. मात्र, पोलिसांनी गाडीवर कारवाई केली नाही.
रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत या कार्यक्रमाला महापौर कविता चोतमोल, आयुक्त सुधाकर देशमुख, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, साहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे उपस्थित होते. ज्या वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले त्यांना ‘इशारा कार्ड’ देऊन जनजागृती करण्यात आली. त्या वेळी विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांना यमराज भेट देत होते. या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती उपस्थित होत्या. त्यांच्या गाडीला फॅन्सी नंबर प्लेट असूनही यांच्या गाडीवर मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ही बाब वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी कारवाई करण्याचे टाळले. कार्यक्रम स्थळापासून हाकेच्या अंतरावर फॅन्सी नंबर प्लेट लावलेली ही चार चाकी गाडी उभी होती. त्यामुळे या फॅन्सी नंबरप्लेटवर कारवाई कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पनवेल वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते यांनी याप्प्रकरणी रवाई करतो, असे सांगितले.