Fake information provided for e-pass | ई-पाससाठी दिली बनावट माहिती, पाच हजार अर्जांना दाखविली केराची टोपली

ई-पाससाठी दिली बनावट माहिती, पाच हजार अर्जांना दाखविली केराची टोपली

आविष्कार देसाई।

रायगड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ई-पास घेतल्याशिवाय सध्या कोणालाच प्रवास करता येत नाही. रायगड जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत एक लाख २८ हजार ६४ ई-पास दिले आहेत. खोटी कारणे आणि बनावट माहिती भरून ई-पास घेण्याच्या तयारीत असणाऱ्या सुमारे पाच हजार अर्जांना जिल्हा प्रशासनाने केराची टोपली दाखविली आहे.

कोरोनामुळे नागरिकांना प्रवास करणे मुश्कील झाले आहे. अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनसारखी स्थिती आहे. महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करणे ज्यांना खरोखरच गरजेचे आहे, त्यांच्यासाठी प्रशासनाने ई-पासची व्यवस्था केली आहे. आॅनलाइन अर्ज भरल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून टोकन नंबर दिला जातो. त्यानंतर, संबंधिताला ई-पास देण्यात येतो. ई-पास मिळविण्यासाठी मुंबई, कांदिवली, घाटकोपर येथील अर्जदारांनी रायगड जिल्ह्यातील खोटे पत्ते दिल्याचे समोर आले आहे, तसेच यासाठी त्याच परिसरातील डॉक्टरांचे प्रमाणपत्रही जोडण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सदरचे अर्जदार हे रायगड जिल्ह्यातील नसल्याचे स्पष्ट झाल्याने, रायगड जिल्हा प्रशासनाने असे सुमारे पाच हजार अर्ज बाद केले आहेत. प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या ही बाब लक्षात आल्यानेच त्यांना ई-पास दिले गेले नाहीत, असे नायब तहसीलदार यशवंत वैशंपायन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये तर गुजरात आणि राजस्थान राज्यात जाणाऱ्यांची संख्या अचानक वाढली होती. रायगड जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या संख्येने सर्वसाधरणपणे या राज्यात मोठ्या संख्येने जात नाहीत. त्यामुळे या प्रकरणी खोलात जाऊन माहिती घेतल्यावर संबंधित अर्जदार हे पनवेल आयुक्तालय हद्दीतील असल्याचे समोर आले. त्यामुळे ते अर्ज त्यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. लॉकडाऊनच्या कालावधीत कामगार, मजुरांना आपापल्या गावी जाता यावे, यासाठी ई-पासची संकल्पना आखण्यात आली होती. आता मात्र, सर्रासपणे ई-पास देण्यात येत आहेत. ई-पासची गरज असलेल्या अर्जदारांच्या अर्जामध्ये डॉक्टरचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मेडिकलचे कारण देण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. काही अर्जदार तर नातेवाइकांच्या मृत्यूचे कारण देत असल्याचे दिसून येते.
काही अर्जांमध्ये एकच संपर्क क्रमांक देण्यात आला होता. त्यामुळे अशा अर्जदारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

पास मिळण्यासाठी दिलेली कारणे
पर जिल्ह्यात नातेवाईक अडकले
आहेत, हे कारण देणाºयांची संख्या सुमारे ५०-६० टक्के
मेडिकलचे कारण देणारे सुमारे ३०-४० टक्के
आजारपणाचे कारणे देणारे १०-१५ टक्के
लग्न सोहळ्याचे कारण देणारे सुमारे ५ टक्के
मृत्यूचे कारण देणारे सुमारे ५ टक्के

मजेशीर किस्सा : कुत्र्याची तब्बेत बिघडली आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी मुंबईला न्यावे लागणार आहे.
, ई पाससाठी अशीही कारणे काहींनी अर्जात दिली आहेत.

जिल्हाधिकाºयांकडून मनाई
च्सातारा, अमरावती, सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाºयांनी तर आमच्या जिल्ह्यात येणाºयांसाठी ई-पास देऊ नये, अशी विनंती केली आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव पाहून अशी मागणी केली असण्याची शक्यता आहे.

च्जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत १ लाख २८ हजार ६४ ई-पास दिले आहेत, तर १ लाख ८६ हजार ४८८ अर्ज बाद केले आहेत. सदरची आकडेवारी ही ४ आॅगस्ट, २०२० पर्यंतची आहे.
 

Web Title: Fake information provided for e-pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.