कारखान्यांची सुरक्षा वाऱ्यावर
By Admin | Updated: May 31, 2016 03:21 IST2016-05-31T03:21:54+5:302016-05-31T03:21:54+5:30
तळोजा औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या सुमारे ८७९ छोट्या-मोठ्या कारखान्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी तळोजा अग्निशमन दलाच्या अवघ्या दोन गाड्यांवर असल्याचे समोर आले

कारखान्यांची सुरक्षा वाऱ्यावर
तळोजा : तळोजा औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या सुमारे ८७९ छोट्या-मोठ्या कारखान्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी तळोजा अग्निशमन दलाच्या अवघ्या दोन गाड्यांवर असल्याचे समोर आले असून डोंबिवलीप्रमाणे एखादी घटना घडल्यास फायर ब्रिगेडकडे यंत्रणा अपुरी असल्याने हानी होऊ शकते.
तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या फायर ब्रिगेडच्या दलात ६००० लिटर व ४००० लिटर अशी दोनच वाहने असून याची क्षमता फारच कमी असल्याने एखाद्या ठिकाणी आग लागल्यास हे बंब काही मिनिटांतच रिकामे होतात व पुन्हा ती गाडी भरून आणण्यासाठी फार वेळ वाया जातो. तसेच खारघर, कळंबोली दलाकडून वेळ पडल्यास बंब मागवावे लागतात. तळोजा औद्योगिक अग्निशमन दलात असलेले अपुरे जवान व फायर ब्रिगेडच्या वाहनांमुळे तळोजा औद्योगिक वसाहतीत आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात आणणे अवघड झाले आहे. डोंबिवली औद्योगिक वसाहतीत थरारक घडलेल्या ब्लास्टनंतर प्रशासन व यंत्रणा खडबडून जागी झाली, मात्र तळोजा औद्योगिक वसाहतीत कारखानदारांची सुरक्षा करणारी फायर ब्रिगेड सेवा बारगळली आहे. या ठिकाणी असलेले अग्निशमन अधिकारी गुंड यांनी अपुरे कर्मचारी असल्याने त्यांची व फायर वाहनांची या आधी मागणी प्रशासनाकडे केली असल्याचे सांगितले. तळोजात फायर ब्रिगेडच्या ताफ्यात अवघ्या दोन गाड्या आहेत व त्यातील एक ६००० व एक४००० क्षमतेच्या आहेत. या दोन वाहनांची सुविधा अपुरी असून या परिसरासाठी १० हजार लिटरच्या पाच गाड्यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तळोजा फायर ब्रिगेडकडे असलेल्या दोन गाड्यांपासून आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या समस्या उद्भवत आहेत.