एमजेपीकडून अतिरिक्त पाणी
By Admin | Updated: February 29, 2016 02:03 IST2016-02-29T02:03:13+5:302016-02-29T02:03:13+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जुनाट जलवाहिन्या बदलण्याकरिता पनवेल नगरपालिका ३० कोटींचा आर्थिक हातभार लावणार आहे

एमजेपीकडून अतिरिक्त पाणी
प्रशांत शेडगे, पनवेल
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जुनाट जलवाहिन्या बदलण्याकरिता पनवेल नगरपालिका ३० कोटींचा आर्थिक हातभार लावणार आहे. त्या बदल्यात प्राधिकरणाकडून पनवेल शहरासाठी २० एमएलडी पाणी अतिरिक्त साठा म्हणून ठेवावे लागणार आहे. अमृत योजनेंतर्गत पालिकेला मिळणाऱ्या निधीतून हे पैसे वर्ग करण्यात येणार आहेत.
अर्थसंकल्पामध्ये सुध्दा प्रशासनाने पाण्यासाठी विशेष तरतूद केली आहे. जलवाहिन्या बदलण्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १९६ कोटींचा आराखडा तयार केला आहे. याकरिता सिडको १४४, जेएनपीटी ४६ कोटी, त्याचबरोबर पनवेल नगरपालिका ३० कोटींचा आर्थिक सहभाग घेणार आहे. त्याबाबतचा करारनामा तयार आहे. पनवेल नगरपालिकेला अमृत योजनेंतर्गत २०१५-१६ व पुढील पाच वर्षाकरिता ५०.५० कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये ५० टक्के केंद्र शासन आणि प्रत्येकी २५ टक्के राज्य शासन व पनवेल नगरपालिकेकडून निधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये प्रथम टप्प्यातील पाणी योजनांना प्राधान्य देण्यात येणार आहे. पैकी ३० कोटी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला २०.० द.ल.लि प्रतिदिन अतिरिक्त पाणी (आरक्षित) देण्यात येणार आहेत. याकामी पनवेल पालिकेने विहित पध्दतीने विस्तृत अहवाल अंदाजपत्रे व आराखडे एमजेपीकडे सादर केले आहेत. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर निधी प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात येणार आहे.
पनवेल शहराचे मालकीचे देहरंग धरण असले तरी या धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी आहे. पालिकेची २७ एमएलडीची गरज असताना उन्हाळावगळता इतर महिन्यात पालिकेला जास्तीत जास्त १२ एमएलडी पाणी धरणातून मिळते. उर्वरित तहान एमजेपी, एमआयडीसी आणि सिडकोकडून भागावी लागते. एमजेपीच्या जुनाट वाहिन्यांना फुटीचे ग्रहण लागल्याने वारंवार शटडाऊन घ्यावा लागतो. त्यावेळी पालिकेला तारेवरची कसरत करावी लागते.