नागोठणे : पक्षविरोधी कार्यवाही केल्याचा ठपका ठेवत जिल्ह्यातील काही शिवसैनिकांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचे सेनाभवनातून प्रसिद्ध झालेल्या पत्रातून सूचित करण्यात आले आहे. यात येथील माजी जिल्हाध्यक्ष विलास गोळे, माजी रोहे तालुकाप्रमुख कृष्णा धामणे, उप तालुकाप्रमुख विठोबा शिर्के यांच्यासह पेण आणि इतर तालुक्यांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. याबाबत विलास गोळे यांच्याशी संपर्क साधला असता, नुकत्याच झालेल्या निवडणुकीपूर्वी घेण्यात आलेल्या नियोजनाच्या बैठकीत एका नेत्याने नागोठण्यातील सेनेच्या पाच - सहा जणांनी मला बाजूला काढावयाचे असून त्याबाबत कें द्रीय मंत्री अनंत गीते यांच्याशी लवकरच संवाद साधणार असल्याचे तेव्हा घोषित केले असल्याने आज झालेली हकालपट्टी पूर्वनियोजित अशीच होती असे स्पष्ट झाले असल्याची प्रतिक्रिया दिली. मला जे काही बोलायचे आहे, ते लवकरच पत्रकार परिषद घेऊन उघड करणार असल्याचे गोळे यांनी या वेळी स्पष्ट केले. जिल्ह्यातील हकालपट्टीच्या संदर्भात जिल्हाध्यक्ष प्रकाश देसाई आणि जिल्हा सल्लागार तथा जि. प. सदस्य किशोर जैन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही. (वार्ताहर)
शिवसेनेतून हकालपट्टी
By admin | Updated: March 21, 2017 02:02 IST