सरल प्रणालीसाठी शिक्षकांना पाहिजे मुदतवाढ
By Admin | Updated: September 26, 2015 00:50 IST2015-09-26T00:50:07+5:302015-09-26T00:50:07+5:30
राज्यातील शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांची आॅनलाईन माहिती सरल प्रणालीने भरण्याचे काम शासनाच्या आदेशानुसार सुरू आहे.

सरल प्रणालीसाठी शिक्षकांना पाहिजे मुदतवाढ
भिवंडी : राज्यातील शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांची आॅनलाईन माहिती सरल प्रणालीने भरण्याचे काम शासनाच्या आदेशानुसार सुरू आहे. दरम्यान गणेशोत्सव व बकरी ईद सणांच्या सुट्ट्या असल्याने या कामासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शिक्षक परिषदेचे राज्यकार्यकारणी सदस्य सुधीर घागस यांनी पत्राद्वारे केली आहे.
जुलै महिन्यापासून सरलप्रणाली डेटाइंट्रीचे काम राज्यातील शाळांमधून सुरू आहे. या काळात संगणकावर सर्व्हर डाटा डाऊनलोड होण्यासारख्या तांत्रिक काम संथगतीने सुरू होते. या अडचणीची नोंद घेऊन शिक्षण आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी राज्यात विभागनिहाय मुदत वाढ दिली. ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर व सातारा या विभागासाठी २४ ते २८ सप्टेंबर हा कालावधी देण्यात आला. वास्तविक कोकणपट्टयात गणेशोत्सव व बकरी ईद या दोन्ही सणांना जास्त महत्त्व दिले जाते आणि लोक आपापल्या गावी जाऊन सणांमध्ये सहभागी होतात. सणांंमुळे २४ ते २८ सप्टेंबर हा कालावधी अडचणीचा ठरला असल्याने सरल प्रणालीची माहिती भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशा मागणीचे पत्र महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षण मंत्री विनोद तावडे,शालेय शिक्षण प्रधान सचीव नंदकुमार,शिक्षण आयुक्त पुरषोत्तम भापकर,आमदार रामनाथ मोते यांना दिले आहे. (प्रतिनिधी)