आंब्याची निर्यात घसरली

By Admin | Updated: June 3, 2016 02:01 IST2016-06-03T02:01:16+5:302016-06-03T02:01:16+5:30

फळांचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या आंब्याची निर्यात घसरू लागली आहे. आठ वर्षांमध्ये निर्यात पन्नास टक्क्याने कमी झाली आहे.

Export of mangoes dropped | आंब्याची निर्यात घसरली

आंब्याची निर्यात घसरली

नामदेव मोरे,  नवी मुंबई
फळांचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या आंब्याची निर्यात घसरू लागली आहे. आठ वर्षांमध्ये निर्यात पन्नास टक्क्याने कमी झाली आहे. बदलते हवामान, मालाचा दर्जा व इतर कारणांनी ही घसरण होत आहे. ७० टक्के व्यवसाय आखाती देशांवर अवलंबून असून दोन दशकांमध्ये नवीन बाजारपेठा शोधण्यात आलेल्या अपयशामुळेही निर्यातीवर परिणाम होऊ लागला आहे.
कृषी मालाची निर्यात वाढविण्यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. परंतु प्रत्यक्षात निर्यात वाढविण्यापेक्षा कमीच होत आहे. निर्यात घसरलेल्या कृषी मालामध्ये आंब्याचाही समावेश आहे. शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळावा व फळांचा राजा जगभर उपलब्ध व्हावा यासाठी दोन दशकांपासून आंब्याची निर्यात मोठ्या प्रमाणात सुरू झाली. १९९४ - ९५ मध्ये भारतामधून २५,४०६ मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाली होती. निर्यातीमधून ४५ कोटींची उलाढाल झाली होती. पुढील दहा वर्षे निर्यात दुप्पट झाली. एकविसाव्या शतकामध्ये जगभरातील व्यापाराची प्रक्रिया सुलभ झाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असे वाटले होते. २००८ मध्ये तब्बल ८३,६९८ मेट्रिक टन एवढी निर्यात झाली. १९९५ च्या तुलनेमध्ये हा आकडा तिप्पट होता. परंतु त्यानंतर सुरू झालेली घसरण अद्याप थांबलेली नाही.
भारतीय आंब्याचा व्यापार अडीच दशकांपासून आखाती देशांना नजरेसमोर ठेवूनच केला जात आहे. संयुक्त अरब अमिराती, कुवेत, कतार, बहरीन या देशांमध्ये ७० टक्के निर्यात होत आहे. बहुतांश निर्यात समुद्रमार्गे होत असून आता हवाई मार्गाने निर्यातीचा टक्काही वाढला आहे. आखाती देशांव्यतिरिक्त मोठी बाजारपेठ निर्माण करण्यात अद्याप यश आलेले नाही. आंबा अमेरिकेमध्ये गेल्याचे कौतुक सर्वत्र होते. परंतु एकूण व्यापारामध्ये हा आकडा नगण्यच आहे. २०१४ - १५ मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये २९,२३१ मेट्रिक टन निर्यात झाली होती. अमेरिकेमध्ये मात्र फक्त २७१ मेट्रिक टन निर्यात झाली होती. युरोपीयन देशांमध्ये व्यापार सुरू केला होता. परंतु दोन वर्षापूर्वी युरोपीयन देशांनी आंबा व इतर चार वस्तूंवर बंदी घातल्याने त्याचा परिणामही विदेशी व्यापारावर झाला आहे. निर्यातदार जास्तीत जास्त आंबा निर्यात करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रत्येक वर्षी हंगाम संपला की येणाऱ्या अडचणी शासनाकडे मांडल्या जात आहे. शासनही आता सहकार्य करू लागले आहे. परंतु त्यानंतरही निर्यात वाढत नाही. आंबा निर्यात वाढली तर देशांतर्गत मार्केटमध्येही चांगला बाजारभाव उपलब्ध होवू शकतो. यामुळे निर्यात वाढविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Export of mangoes dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.