नाकाबंदीत वाहनांच्या माहितीसाठी ‘तलाश’

By Admin | Updated: November 3, 2015 01:01 IST2015-11-03T01:01:59+5:302015-11-03T01:01:59+5:30

नाकाबंदीदरम्यान अडवलेल्या संशयित वाहनांची संपूर्ण माहिती तिथल्या पोलिसांना काही क्षणातच मिळणार आहे. यासाठी ‘तलाश’ नावाचे अद्ययावत सॉफ्टवेअर कार्यरत करण्यात आले

'Exploring' for information about blockade vehicles | नाकाबंदीत वाहनांच्या माहितीसाठी ‘तलाश’

नाकाबंदीत वाहनांच्या माहितीसाठी ‘तलाश’

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबई
नाकाबंदीदरम्यान अडवलेल्या संशयित वाहनांची संपूर्ण माहिती तिथल्या पोलिसांना काही क्षणातच मिळणार आहे. यासाठी ‘तलाश’ नावाचे अद्ययावत सॉफ्टवेअर कार्यरत करण्यात आले असून सोमवारपासून त्याची सुरवात करण्यात आली. यामुळे पोलिसांच्या हातावर तुरी देवून निसटण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहन चालकांना लगाम बसणार आहे.
पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान अडवलेल्या अनेक वाहन चालकांचे पोलिसांसोबत वाद होत असतात. वाहनावर अथवा चालकावर संशय असल्याने पोलिसांकडून ते वाहन वापरणाऱ्याकडे वाहनाच्या कागदपत्रांची चौकशी केली जाते. अशावेळी ती व्यक्ती पोलिसांवरच रुबाब झाडत तिथून निसटण्याचा प्रयत्न करत असते.
नाकाबंदीच्या ठिकाणी अनेकदा पोलीस व नागरिकांचे वाद सुरु असतात. शिवाय अडवलेले वाहन चोरीचे अथवा गुन्ह्यात वापरलेले असतानाही त्याची खोटी कागदपत्रे पोलिसांपुढे मांडून सराईत गुन्हेगार देखील सहज निसटत असतात. शिवाय शहरात घडणारी वाहनचोरी व मोटारसायकलवरून होणारी सोनसाखळी चोरी ही देखील पोलिसांची डोकेदुखी आहेच. त्यामुळे नाकाबंदी करुनही त्याठिकाणी गुन्हेगार पकडले जाण्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा खूपच कमी आहे. मात्र यापुढे पोलिसांनी अडवलेल्या संशयित वाहनाची संपूर्ण माहिती त्यांना अवघ्या अर्ध्या मिनिटात मिळणार आहे. याकरिता परिमंडळ १ चे उपायुक्त शहाजी उमाप यांनी अद्ययावत यंत्रणा अमलात आणली आहे.
तलाश नावाचे सॉफ्टवेअर विकसित करुन त्या सॉफ्टवेअरला नाकाबंदीतल्या पोलिसांचे मोबाइल जोडलेले असणार आहेत. या पोलिसांनी संशयित वाहनाचा नंबर त्या सॉफ्टवेअरवर पाठवताच काही सेकंदात त्या वाहनाची व वाहन मालकाची माहिती त्या पोलिसाला त्याच्या मोबाइलवर मिळणार. एक पोलीस वाहन चालकासोबत बोलत असतानाच दुसरा पोलीस सहजरीत्या हे काम करु शकणार आहे. त्यामुळे संशयित व्यक्ती वाहनाची माहिती खोटी सांगत असल्यास त्याचे पितळ त्याच जागी उघड होणार आहे.
एपीएमसी पोलीस ठाण्यात त्याचा विशेष कंट्रोल रुम तयार करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सरफरे हे त्याचे प्रमुख आहेत.
कंट्रोल रुममधील संगणकातल्या तलाश सॉफ्टवेअरला ३०० अधिकारी व कर्मचारी यांचे मोबाइल नंबर जोडले गेलेत. त्यामध्ये सहाय्यक आयुक्त, दहा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक व नाकाबंदीचे कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यांना कोणत्याही संशयित वाहनाची माहिती सहज मिळावी यासाठी २००६ पासूनच्या राज्यातल्या १८ कोटी वाहनांची माहिती सॉफ्टवेअरमध्ये संकलित केलेली आहे. शिवाय सॉफ्टवेअरची लिंक आरटीओला जोडली असल्याने प्रत्येक वाहनाच्या बदलत्या मालकांचीही सुधारित माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांना नाकाबंदी करताना ही यंत्रणा अधिकच उपयुक्त ठरणार आहे.

गुन्हेगारांचा शोध घेताना त्याचा मोबाइल नंबर देखील पोलिसांना महत्त्वाचा धागा ठरत असतो. मात्र अनेकदा मोबाइल कंपन्यांकडून संबंधित मोबाइलधारकाची माहिती देण्यात विलंब होत असतो. यामुळे पोलीस त्याठिकाणी पोहचेपर्यंत गुन्हेगार फरार झालेला असतो. त्यामुळे अल्पकालावधीत मोबाइल नंबरवरून संबंधिताचा संपूर्ण पत्ता कळेल अशी यंत्रणा पोलिसांनी उपयोगात आणली आहे. वाहन तलाश कंट्रोल रुममधूनच त्याचेही नियंत्रण केले जाणार आहे. या यंत्रणेद्वारे महाराष्ट्र व मुंबई डिव्हिजनमध्ये नोंद असलेल्या कोणत्याही मोबाइल नेटवर्क कंपनीच्या ग्राहकाची माहिती पोलिसांना कळणार आहे.


गुन्हेगारीच्या घटना नियंत्रित करण्यासाठी गुन्हेगाराला पकडण्याची आलेली प्रत्येक संधी महत्त्वाची असते. पोलिसांपुढे आलेली अशी कोणतीही संधी न गमावता गुन्हेगारांच्या मुसक्या आवळता याव्यात याकरिता दोन्ही अद्ययावत यंत्रणा सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे वापरात असलेली चोरीची वाहने पकडण्यात नक्कीच यश येणार आहे.
- शहाजी उमाप, उपायुक्त

Web Title: 'Exploring' for information about blockade vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.