अपंगत्वावर मात करीत देतोय परीक्षा
By Admin | Updated: March 4, 2016 01:52 IST2016-03-04T01:52:31+5:302016-03-04T01:52:31+5:30
शारीरिक अपंगत्वावर मात करून दहावीच्या परीक्षेला बसलेल्या नितीनची जिद्द सर्वसामान्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणारी आहे.

अपंगत्वावर मात करीत देतोय परीक्षा
प्राची सोनवणे, नवी मुंबई
शारीरिक अपंगत्वावर मात करून दहावीच्या परीक्षेला बसलेल्या नितीनची जिद्द सर्वसामान्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणारी आहे. अनेक संकटांवर मात करून शिकण्याची इच्छा असलेल्या नितीन जिगळेने अखेर दहावीच्या परीक्षेचा फॉर्म भरला आणि १ मार्चपासून सुरू झालेल्या या परीक्षेत सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने व्हीलचेअर बसून तो परीक्षा देत आहे. दोन्ही पाय गमावलेल्या नितीनची जिद्द अनेकांसाठी प्रेरणा देणारी आहे.
कोपरखैरणे येथील जिजामाता कॉव्हेंट स्कूल या परीक्षा केंद्रावर सध्या तो परीक्षा देत आहे. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या नितीनने इयत्ता नववीपर्यंतचे शिक्षण नांदेड येथे पूर्ण केले. त्यानंतर कुटुंबाचा आधार नसल्याने नितीनने मुंबईची वाट धरली. पोटाची खळगी भरण्यासाठी त्याने ड्रायव्हरचे काम केले. या दरम्यान झालेल्या अपघातामध्ये नितीनला दोन्ही पाय गमवावे लागले. वाशीतील ‘शरण’ पॅराप्लॅजिक सेंटरने नितीनला आश्रय दिला. त्याच्यातली जिद्द हेरून, अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी या संस्थेच्या वतीने नितीनला मदत करण्यात आली. पहिल्या पेपरच्या दिवशी थोडीशी भीती वाटली होती परंतु गुरुवारी झालेल्या हिंदी विषयाचा पेपर सोपा गेल्याचे सांगताना नितीनच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. आयुष्याची ही लढाई जिंकण्यासाठी विद्येशिवाय दुसरे शस्त्र नाही, अशा शब्दात त्याने शिक्षणाचे महत्त्व सांगितले. परीक्षा सुरु होण्याआधी महिनाभरापूर्वी नितीनचा उजवा हातही पाहिजे तसा काम करु शकत नसल्याने बोर्डाकडे त्याने लेखनिकाची मागणी केली. मात्र परीक्षेच्या काही दिवस आधी हात चांगला झाल्याने स्वत: पेपर लिहिण्याचा निर्णय नितीनने घेतला.