पनवेल महापालिकेसाठी हवे सुस्पष्ट धोरण
By Admin | Updated: June 12, 2016 00:58 IST2016-06-12T00:58:47+5:302016-06-12T00:58:47+5:30
पनवेल शहर व तालुक्याचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी महापालिकाच हवी. महापालिकेमुळे नागरिकांना चांगल्या नागरी सुविधा देणे शक्य होईल. आरोग्य, पाणी, घनकचरा व्यवस्थाप, रस्ते व दर्जेदार

पनवेल महापालिकेसाठी हवे सुस्पष्ट धोरण
- वैभव गायकर, पनवेल
पनवेल शहर व तालुक्याचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी महापालिकाच हवी. महापालिकेमुळे नागरिकांना चांगल्या नागरी सुविधा देणे शक्य होईल. आरोग्य, पाणी, घनकचरा व्यवस्थाप, रस्ते व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देता येणार आहे. विकासासाठी महापालिका हवीच, परंतु त्याविषयी नागरिकांच्या मनात असणाऱ्या शंकांविषयी शासनाने योग्य निरसन करावे, अशी भूमिका नागरिक व लोकप्रतिनिधींनी लोकमत आयोजित कशी असावी महानगरपालिका, या चर्चासत्रामध्ये व्यक्त केली.
पनवेल महानगरपालिकेविषयी नागरिक व लोकप्रतिनिधींची काय अपेक्षा आहे, हे जाणून घेण्यासाठी लोकमत, सिटिझन्स युनिटी फोरम व केएलई संस्थेचे विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, कळंबोली यांच्या वतीने हे चर्चासत्र आयोजित केले होते. महापालिकेविषयी विचार ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त व शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी या परिसराच्या विकासासाठी महापालिकाच योग्य असल्याचे पटवून दिली. सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला केले पाहिजेत. महापालिकेमुळे या परिसराच्या विकासाचे योग्य नियोजन करणे शक्य होणार आहे. महापालिकेला विरोधासाठी विरोध केला जाऊ नये. महापालिका आल्यानंतर करवाढ होईल हेही पूर्ण वास्तव नाही. कर निश्चितीचा अधिकार महासभेला असल्याचेही त्यांनी सांगून महापालिकेला शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबईचे प्रथम महापौर व माजी खासदार संजीव नाईक यांनी नवी मुंबईला २४ वर्षांत ज्या अडचणींना सामोरे जावे लागले त्या अडचणी पनवेल महापालिकेला येऊ नयेत, अशी भूमिका मांडली. सर्वप्रथम शहराचा विकास आराखडा तयार करून घेतला पाहिजे. पनवेल महापालिकेला नवी मुंबई महापालिका सदैव सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
शेकापचे नेते व माजी आमदार विवेक पाटील यांनी महापालिकेविषयी शासनाने धोरण व भूमिका स्पष्ट केली पाहिजे. नागरिकांमध्ये गोंधळ सुरू आहे. महापालिका झाली म्हणजे सर्व प्रश्न कसे सुटणार, हेही स्पष्ट केले पाहिजे. प्रस्तावित महापालिका कार्यक्षेत्राला पाणी कुठून येणार, विकासासाठी निधी कसा येणार, याविषयी स्पष्टता हवी. महापालिकेला कोणाचा विरोध नाही, परंतु पुर्ण तालुक्याचा त्यामध्ये समावेश पाहिजे असे मत व्यक्त केले. नगराध्यक्षा चारुशीला घरत यांनीही महापालिका का गरजेची आहे, याविषयी भूमिका मांडली. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व वक्त्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. नागरिकांच्या मनात असलेल्या शंका व्यक्त झाल्याच पाहिजे. त्या शंकांचे निरसन करता येईल. नागरिकांच्या सूचना व हरकती लक्षात घेवूनच शासन पुढील कार्यवाही करेल. पनवेल शहर व तालुक्याच्या विकासासाठी महापालिकाच असली पाहिजे. महापालिका असेल तर व्यवस्थित नियोजन करता येईल. सिडको अद्याप विकसित नोडमध्ये उद्यान, मैदान, पाणी व इतर सुविधा देऊ शकली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
‘कफ’चे योगदान महत्त्वाचे
पनवेलमधील सिटिझन्स युनिटी फोरमने कशी असावी महानगरपालिका, या विषयावरील चर्चासत्र घडवून आणल्याविषयी वक्त्यांनी त्यांचे आभार मानले.
नागरिक व लोकप्रतिनिधींना त्यांचे विचार मांडण्याचे व्यासपीठ यानिमित्ताने उपलब्ध झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनीही कफचे आभार मानले.
या चर्चासत्राच्या नियोजनामध्ये कफच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्याने चर्चासत्र यशस्वी झाले.
नवी मुंबईला आलेल्या अडचणी पनवेल महापालिकेला येऊ नयेत, यासाठी दक्षता घेतली पाहिजे. सिडकोकडून सामाजिक सुविधेचे सर्व भूखंड ताब्यात घेतले पाहिजेत. शहराचा विकास आराखडा सर्वप्रथम करणे आवश्यक आहे. शासनाने मदतीचा हात द्यावा. नवी मुंबई पालिका पनवेलकरांना आवश्यक ते सर्व सहकार्य करेल.
- संजीव नाईक, माजी खासदार, ठाणे
महानगरपालिकेला विरोध नाही, परंतु याविषयी शासनाने धोरण स्पष्ट केले पाहिजे. पूर्ण तालुक्याचाच महापालिकेमध्ये समावेश असला पाहिजे. सिडको, नैना, एमएमआरडीए यांची भूमिका काय असणार हेही स्पष्ट केले पाहिजे. शंकांचे निरसन केले नाही तर नागरिक न्यायालयाचे दरवाजे ठोठावतील.
-विवेक पाटील
माजी आमदार, उरण-पनवेल
सिडको पनवेल तालुक्याचा योग्य विकास करू शकली नाही. नागरिकांसाठी पाणी, रस्ते, गटर, उद्याने, मैदाने पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिले नाही. नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळवून देण्यासाठी महापालिकेचा आग्रह आम्ही धरला आहे. नागरिकांनी त्यांच्या मनातील भूमिका स्पष्ट केल्या, ही स्वागतार्ह गोष्ट असून त्यांचे निरसन केले जाईल.
-प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल
पनवेलच्या विकासासाठी महापालिकाच पाहिजे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सर्वांनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. महापालिकेमुळे पूर्ण तालुक्याच्या विकासाला गती येईल. महापालिका असल्यामुळे नवी मुंबईचा झपाट्याने विकास झाला. पनवेलचाही त्यापेक्षा अधीक गतीने विकास होईल.
- विजय नाहटा
शिवसेना उपनेते
जागा व निधीअभावी पनवेलमध्ये आवश्यकता असूनही जनहिताचे अनेक प्रकल्प राबविता येत नाहीत. विकासाला गती देण्यासाठी शहरासह तालुक्याचे महापालिकेत रूपांतर होणे आवश्यक आहे. शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी जागा हवी असून, महापालिका झाल्यास प्रस्तावित प्रकल्प प्रत्यक्ष साकारने शक्य आहे.
-चारुशीला घरत, नगराध्यक्षा, पनवेल