कुंडलिका नदीत रेती उत्खनन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2015 02:34 IST2015-12-25T02:34:26+5:302015-12-25T02:34:26+5:30
रोहा तालुक्यातील कुंडलिका आणि भालगाव खाडीत सक्शन पंपाच्या साहाय्याने रेती उत्खनन सुरू झाले आहे. या उत्खननावर रोहा महसूल प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली होती

कुंडलिका नदीत रेती उत्खनन सुरू
रोहा : रोहा तालुक्यातील कुंडलिका आणि भालगाव खाडीत सक्शन पंपाच्या साहाय्याने रेती उत्खनन सुरू झाले आहे. या उत्खननावर रोहा महसूल प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली होती. काही दिवस गेल्यानंतर पुनश्च वाळूमाफिया येथे सक्रिय झाले असून, दिवसरात्र बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. या वाळूची वाहतूक जिल्ह्यासह मुंबई, पुणे या ठिकाणी रात्रीच्या वेळी केली जात आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले व पोलीस अधीक्षकपदी मोहम्मद सुवेझ हक यांच्यासमोर अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक रोखण्याचे मोठे आव्हान आहे.
रोहा तालुक्यात हातपाटीद्वारे रेती उत्खनन करण्यास जिल्हा महसूल शाखेने परवानगी दिली आहे. परवानगीप्रमाणे समुद्रात उड्या मारून वाळूचे उत्खनन करायला हवी; मात्र कुंडलिका आणि भालगाव खाडीत हातपाटीने रेती उत्खननाचा परवाना घेऊन त्याऐवजी सक्शन पंप, होड्या आदी यंत्रणेच्या साहाय्याने रेतीचे मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या उत्खनन करण्यात येत आहे. मध्यरात्री रेतीचे उत्खनन व वाहतूक केली जात आहे.
खारापाटी ते न्हावे आणि विशेष करून सानेगाव, यशवंतखार, करंजवीरा या गावांलगत खाडीतून रेती उत्खनन केली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. आजूबाजूच्या जमिनीची धूप होत असून, जमिनीचे क्षेत्र कमी होत आहे. खाडीलगत असणारी कांदळवने रेती उपशामुळे नष्ट होत आहेत. परंतु पैशाच्या हव्यासापोटी रेती व्यावसायिक बिनदिक्कतपणे अनिर्बंध वाळूउपसा करीत आहेत. अमर्याद वाळूउपशामुळे भरतीचे पाणी मोठ्या प्रमाणावर खाडीद्वारे शेतांमधून जात आहे. यामुळे या परिसरातील हजारो हेक्टर शेती नापीक झाली आहे.
अवैधरीत्या उपसा केलेली वाळू चोरीछुपे वाहून नेण्यासाठी भरधाव वेगाने ट्रक, डम्पर चालविले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेने रोहा-चणेरा मार्गावर दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर सक्शनद्वारे वाळू उत्खनन करून मुंबई, पुणे या ठिकाणी वाहतूक केली जाते. (वार्ताहर)
अवैध वाळू उत्खनन व वाहतूक होणाऱ्या ठिकाणचे मेरिटाइम बोर्डाचे अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षकांवर एमपीडीए अंतर्गत गुन्हे दाखल केल्यास वाळू चोरीला आळा बसू शकेल.
- जितेंद्र जोशी, सामाजिक कार्यकर्ते