नापास विद्यार्थ्यांची सोमवारी परीक्षा
By Admin | Updated: July 16, 2016 01:50 IST2016-07-16T01:50:35+5:302016-07-16T01:50:35+5:30
महाविद्यालयीन प्रवेशाची लगीनघाई सुरू असतानाच १० वी व १२ वीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा कोकण विभागीय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जात आहे.

नापास विद्यार्थ्यांची सोमवारी परीक्षा
ठाणे : महाविद्यालयीन प्रवेशाची लगीनघाई सुरू असतानाच १० वी व १२ वीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा कोकण विभागीय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जात आहे. यानुसार १२ वीतील आठ हजार ५१८ विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत सुरू असून १० वीच्या ११ हजार १७१ विद्यार्थ्यांची परीक्षा सोमवार, १८ जुलैपासून घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्रास परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांची ही पुनर्परीक्षा २९ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. या साडेआठ हजार विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था १२ परीक्षा केंद्रांवर केली आहे. याशिवाय ३ आॅगस्टदरम्यान पार पडणाऱ्या १० वीच्या पुनर्परीक्षेला जिल्ह्यातील ११ हजार १७१ विद्यार्थी आहेत. त्यांची जिल्ह्यातील २८ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात आहे. परीक्षा केंद्रांत व आजूबाजूच्या परिसरांत शांतता व सुव्यवस्था राखण्यासह अनुचित प्रकारास आळा घालण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
परीक्षा काळामध्ये परिरक्षण केंद्र,परीक्षा केंद्र, उपकेंद्र व परिसरात काही असामाजिक तत्त्वे परीक्षा प्रक्रि येत गैरव्यवहार व बाधा निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलिफोन बुथ, कम्युनिकेशन सेंटर या ठिकाणांहून गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. याशिवाय बेकायदेशीर जमाव जमवून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अगर शांतताभंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवरील या अनुचित घटनांना वेळीच प्रतिबंध घालणे जरु रीचे आहे.