१२ वर्षे झाली तरी गटशिक्षणाधिकारी नाही

By Admin | Updated: April 23, 2016 02:01 IST2016-04-23T02:01:18+5:302016-04-23T02:01:18+5:30

तळा तालुका निर्मिती २६ जून १९९९ मध्ये झाली. त्यानंतर तळा पंचायत समिती निर्माण झाली. तोपर्यंत तळ्याचे सर्व कामकाज माणगांव पंचायत समितीमार्फत चालत होते.

Even after 12 years, there is no Govt | १२ वर्षे झाली तरी गटशिक्षणाधिकारी नाही

१२ वर्षे झाली तरी गटशिक्षणाधिकारी नाही

तळा : तळा तालुका निर्मिती २६ जून १९९९ मध्ये झाली. त्यानंतर तळा पंचायत समिती निर्माण झाली. तोपर्यंत तळ्याचे सर्व कामकाज माणगांव पंचायत समितीमार्फत चालत होते. साधारणपणे माणगांव पंचायत समितीमधून तळा पंचायत समितीचा शिक्षण विभाग २००४ मध्ये स्वतंत्र झाला. तेव्हापासून तळा पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत तालुक्यातील शिक्षण विभागाचे कामकाज पाहिले जात आहे. २००४ ते २०१६ अशी तब्बल १२ वर्षे तळा पंचायत समिती शिक्षण विभागाला गटशिक्षण अधिकारी नाहीत. या अगोदर गटविकास अधिकारी हे काम पाहत असत. गटशिक्षण अधिकारी पद रिक्त असल्याने हे पद त्वरित भरून जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
२ ते १३ आॅगस्ट २००६ या ११ दिवसांसाठी एस. जी. झंझणे यांची गटशिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. ११ दिवसातच ताबडतोब त्यांची दापोली येथे बदली करण्यात आली. आणि आज जवळपास १२ वर्षे गटशिक्षणाधिकारी हे पद रिक्त आहे. तळा हा नव्याने निर्माण झालेला डोंगरी आणि दुर्गम तालुका आहे. या तालुक्यातील शाळांमधील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी किंबहुना साक्षरतेचे प्रमाण वाढीसाठी यासह शासनाच्या विविध शैक्षणिक योजना तळागाळापर्यंत पोहोचविणेसाठी सक्षम आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे.
शासनाने गटशिक्षणाधिकारी हे पद प्रत्येक तालुका पातळीवर निर्माण केलेले आहे. परंतु त्या पदाची अंमलबजावणी होत नाही. मग या पदाचा चार्ज तत्सम अधिकारी किंवा विस्तार अधिकारी यांच्याकडे देवून वेळ मारून नेणे एवढेच काम करणे. आज अनेक ठिकाणी महत्त्वाची पदे रिक्त आहेत.
गटशिक्षणाधिकारी पद रिक्त असल्यामुळे शिक्षण विभागात अनेक कामांची अडचण होते. तरी शिक्षणाधिकारी रायगड जिल्हा परिषदेने हे पद त्वरित भरून जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)

Web Title: Even after 12 years, there is no Govt