ईटीसी बनले ‘प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी
By Admin | Updated: August 16, 2016 04:50 IST2016-08-16T04:50:51+5:302016-08-16T04:50:51+5:30
राष्ट्रीय स्तरावर दखल घेतलेले पालिकेचे ईटीसी अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्र वादग्रस्त ठरू लागले आहे. केंद्र संचालिकांची मनमानी सुरू असल्याची टीका बेलापूरच्या आमदार मंदा

ईटीसी बनले ‘प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी
- नामदेव मोरे, नवी मुंबई
राष्ट्रीय स्तरावर दखल घेतलेले पालिकेचे ईटीसी अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्र वादग्रस्त ठरू लागले आहे. केंद्र संचालिकांची मनमानी सुरू असल्याची टीका बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह पालक संघटनेने केली आहे. पालिकेच्या उपक्रमाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे स्वरूप प्राप्त झाले असून, संपूर्ण कामकाजाची सखोल चौकशी करण्याची मागणी महापालिका आयुक्त व शासनाकडे करण्यात आली आहे.
विशेष मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने अपंग शिक्षण व प्रशिक्षण संस्था सुरू केली. विद्यमान संचालिका वर्षा भगत यांची मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. दशकपूर्तीकडे वाटचाल सुरू असलेल्या केंद्राचे नाव अल्पावधीमध्ये देशपातळीवर झाले. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाचा पुरस्कारही मिळाला. यानंतर, केंद्राची व केंद्र संचालिका वर्षा भगत यांच्या कार्याचे सर्व स्तरावर कौतुक झाले.
ईटीसीचा गौरव सुरू असताना दबक्या आवाजामध्ये तेथे हुकूमशाही पद्धतीने कामकाज सुरू असल्याची चर्चा सुरू झाली. पालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागापेक्षा स्वतंत्र दर्जा या शाळेला देण्यात आला. मुख्याध्यापिका असणाऱ्या भगत यांची सरळसेवा पद्धतीने केंद्र संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. ईटीसी केंद्रावर खर्च करण्यासाठी पालिकेने कधीच आखडता हात घेतला नाही. केंद्रावर खर्च वाढत असताना, दुसरीकडे प्रवेश घेण्यासाठी गेल्यास मर्यादा संपल्याने १२०० विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये असल्याचे सांगितले जाते. दोन वर्षांपूर्वी वाशीमधील काँग्रेसच्या तत्कालीन नगरसेविका सिंधुताई नाईक यांनीही स्थायी समितीमध्ये नाराजी व्यक्त केली होती.
ईटीसी केंद्राविषयी नाराजी असली, तरी उघडपणे कोणी बोलत नव्हते, परंतु आमदार मंदा म्हात्रे यांनी अचानक केंद्राला भेट देऊन येथील कामकाजाविषयी उघडपणे नाराजी व्यक्त करीत चौकशीची मागणी केली. यामुळे केंद्राच्या कामकाजाविषयी नाराज पालकांनीही आता उघडपणे मत व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. विशेष मुलांसाठी असलेली बससेवा बंद करण्यात आली. गतिमंद मुलांसाठी रोज फक्त तीन तास शाळा सुरू आहे. गतिमंद मुलांच्या पालकांनी पृथ्वी पालक संस्था स्थापन करून याचा रितसर पाठपुरावा केला. महापालिका आयुक्त, महापौर यांच्याकडेही तक्रारी केल्या. महापालिकेची शाळा असूनही तेथे केंद्र संचालिकांचा मनमानी सुरू आहे.
आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण सांगून विद्यार्थ्यांची बससुविधा बंद करण्यात आली. पालकांनी अपंग शाळा संहितेप्रमाणे येथेही सुविधा मिळाव्या, अशी मागणी केल्यानंतर ईटीसी शाळा नाही, केंद्र असल्याचे सांगण्यात येते. पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या केंद्राच्या कामकाजामध्ये खरोखर काही चुकीचे काम सुरू आहे का, याची चौकशीची आवश्यकता निर्माण झाली आहे.
स्थापनेपासून खर्च तपासण्याची मागणी
ईटीसी केंद्र सुरू केल्यापासून येथे शिक्षण घेणारी विद्यार्थी संख्या, केंद्राच्या कामकाजासाठी झालेला खर्च याची सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. खरोखर किती विद्यार्थ्यांनी केंद्रात शिक्षण घेतले, शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना खरोखर लाभ झाला का? याविषयी पालकांशीही चर्चा केली जावी. ईटीसीच्या वीजबिलाचा आकडाही तपासण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
महापालिकेने फेटाळले आरोप
ईटीसी केंद्राविषयी आमदार मंदा म्हात्रे यांनी केलेले आरोप महापालिकेने फेटाळले आहेत. संस्थेविषयी गैरसमज होऊ नये, यासाठी वस्तुस्थिती मांडण्याचा दावा केला आहे. ईटीसी फक्त शाळा नसून, प्रशिक्षण केंद्र आहे. १२०० विद्यार्थी संस्थेमध्ये प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीत आहेत. वर्षभर प्रवेश सुरू असल्याने गणवेश घेऊन ठेवावे लागतात. भांडारातील साहित्याची वेळोवेळी तपासणी केली जात असून, नियमानुसार खर्च केला जातो. ईटीसी केंद्राच्या यशामध्ये संचालिका वर्षा भगत यांचा मोलाचा वाटा आहे. अभ्यासू व सर्वसमावेशक कार्यपद्धतीमुळे केंद्राला पंतप्रधानांकडून पुरस्कार मिळाला आहे. भगत यांनी अपंग शिक्षण विषयात डॉक्टरेट मिळविली आहे. त्यांची नियुक्तीही सरळसेवा प्रक्रियेने केली आहे. भोगवटा प्रमाणपत्राविषयीही पालिकेने खुलासा केला आहे. सीआरझेड क्षेत्रात ही इमारत असून, भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी एमसीझेडएकडे अर्ज केला आहे.