सिंधुदुर्गवासीयांची गावाशी नाळ जोडण्याचा अखंड प्रयत्न
By वैभव गायकर | Updated: June 11, 2023 13:41 IST2023-06-11T13:40:34+5:302023-06-11T13:41:22+5:30
माणूस कितीही मोठा झाला, तरी त्याची नाळ आपल्या गावाशी अथवा जन्मभूमीशी जोडलेली असते.

सिंधुदुर्गवासीयांची गावाशी नाळ जोडण्याचा अखंड प्रयत्न
- वैभव गायकर, माणूस कितीही मोठा झाला, तरी त्याची नाळ आपल्या गावाशी अथवा जन्मभूमीशी जोडलेली असते. ती जोडलेली असावी या हेतूने काम करणारे सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ पनवेलमध्ये कार्यरत आहे. जवळपास ६०० सभासदांचा समावेश असलेल्या या संघात कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पनवेलमध्ये स्थायिक झालेल्या कोकणवासीयांचा समावेश आहे. १९८७ साली या संघाची स्थापना दिवंगत प्रभाकर तावडे यांनी केली.
सिंधुदुर्गवासीयांचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास तसेच रोजगार, उद्योग उभारणीसाठी ही संस्था कार्यरत आहे. आजवर आपल्या बांधवांच्या हितासाठी रक्तदान, आरोग्य शिबिर, होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, अनाथ मुलांना दिवाळी फराळवाटप, कोकणातील रखडलेल्या मार्गासाठी आंदोलन, मालवणी जत्रोत्सव व कौटुंबिक संमेलन, वृक्षारोपण आदींसह अनेक कार्यक्रम ही संस्था राबवते.
संस्कृती टिकविण्याचे काम
- संस्थापक सदस्यांमध्ये प्रभाकर तावडे यांच्यासह अरविंद पाटकर, भास्करराव धुरी, भाऊ परब, भाई परब, अविनाश सावंत आदींचा समावेश होता.
- कोकणातून पनवेलसारख्या शहरात स्थायिक झाल्यानंतर आपल्या गावाची संस्कृती शहरातदेखील टिकविण्याचे काम हे संघ प्रामाणिकपणे करतात.
- सिंधुदुर्गवासीयांना एकत्र आणून या रहिवाशांचा सर्वांगीण विकास व अडचणीच्या दृष्टीने त्यांच्या अडचणी सोडवणे व त्यांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने आधुनिक युगाच्या काळात संघाची माहिती आधुनिक प्लॅटफॉर्मवर अर्थातच वेबसाईटवर देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे www.szrhspanvel हे संकेतस्थळ कार्यरत आहे.
संघाचे पदाधिकारी
अध्यक्ष - केशव राणे, उपाध्यक्ष - संतोष चव्हाण आणि प्रिया खोबरेकर, सचिव - रामचंद्र मोचेमाडकर
मागील ३६ वर्षांपासून आमचा संघ पनवेलसारख्या शहरात कार्यरत आहे. या कालावधीत असंख्य समाजहिताची कामे आम्ही केवळ सिंधुदुर्गातील रहिवाशांसाठी नव्हे, तर सर्वच समाजबांधवांसाठीच केली. वेगवेगळे सामाजिक कार्य आम्ही केले आहे. हा वारसा पुढेही सुरूच राहणार आहे. - केशव राणे, अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ