सानपाडा रेल्वे स्टेशनच्या प्रसाधनगृहामध्ये अतिक्रमण
By Admin | Updated: July 29, 2016 02:31 IST2016-07-29T02:31:08+5:302016-07-29T02:31:08+5:30
सानपाडा रेल्वे स्टेशन इमारतीच्या तळमजल्यावरील सार्वजनिक प्रसाधनगृहाची भिंत तोडून हॉटेल व्यावसायिकाने स्वतंत्र दरवाजा बसविला आहे. गोडावूनप्रमाणे या जागेचा वापर सुरू आहे.

सानपाडा रेल्वे स्टेशनच्या प्रसाधनगृहामध्ये अतिक्रमण
नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्टेशन इमारतीच्या तळमजल्यावरील सार्वजनिक प्रसाधनगृहाची भिंत तोडून हॉटेल व्यावसायिकाने स्वतंत्र दरवाजा बसविला आहे. गोडावूनप्रमाणे या जागेचा वापर सुरू आहे. पहिल्या मजल्यावर जीमच्या व्यवस्थापनाने प्रसाधनगृहाची तोडफोड करून त्यामध्ये अतिक्रमण केले असून तक्रारी करूनही सिडको प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
सानपाडा रेल्वे स्टेशन इमारतीला समस्यांचा विळखा पडू लागला आहे. महापालिकेने सील केलेल्या गाळ्यांचे कुलूप विनापरवाना उघडल्याचे प्रकरण ताजे असताना येथील दोन व्यावसायिकांनी सार्वजनिक वापराच्या प्रसाधनगृहामध्येच अतिक्रमण केले आहे. पश्चिम बाजूला प्रत्येक मजल्यावर गाळेधारकांसाठी सार्वजनिक प्रसाधनगृह उपलब्ध करून दिले आहे. पहिल्या मजल्यावर जीम सुरू केली आहे. जीममध्ये येणाऱ्यांसाठी स्वतंत्र वॉशरूम आवश्यक असल्याने येथील व्यवस्थापनाने तीन महिन्यांपूर्वी कोणालाही विश्वासात न घेता सार्वजनिक प्रसाधनगृहाची तोडफोड करून त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. तोडफोड केल्यानंतर आवश्यक दुरूस्तीची कामे केली नाहीत. यामुळे या मजल्यावर प्रचंड दुर्गंधी पसरू लागली आहे. सिडको प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्यांनी अद्याप काहीच कारवाई केली नाही.
याच विंगमध्ये तळमजल्यावर रसोई रेस्टॉरंट व बार आहे. बारमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र वॉशरूम असावे यासाठी हॉटेल व्यावसायिकाने भिंत तोडून स्वतंत्र दरवाजा तयार केला आहे. पुरूष व महिलांसाठी पूर्वी स्वतंत्र प्रसाधनगृह होते. परंतु येथील महिलांसाठीचे प्रसाधनगृह बंदच केले आहे. सर्व गाळ्यांमधील कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी असलेल्या प्रसाधनगृहांवर दोन व्यावसायिकांनी अतिक्रमण करून सिडको प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने नाराजी व्यक्त केली. सिडकोच्या अधिकाऱ्यांचेच अभय या दोन व्यावसायिकांच्या अतिक्रमणास असल्याचा आरोप होत आहे.