एसटीच्या थांब्यावर खासगी वाहनांचे अतिक्रमण, वाशी वाहतूक चौकीसमोरील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:23 IST2020-12-24T00:22:19+5:302020-12-24T00:23:22+5:30
Vashi : सायन-पनवेल महामार्गावर वाशी वाहतूक पोलीस चौकीसमोरच नियमांचे उल्लंघन सुरू असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.

एसटीच्या थांब्यावर खासगी वाहनांचे अतिक्रमण, वाशी वाहतूक चौकीसमोरील प्रकार
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील अवैध प्रवासी वाहतुकीकडे पोलीसच दुर्लक्ष करत आहेत.
वाशी वाहतूक पोलीस चौकीसमोर एसटी बसेसच्या थांब्यावर खासगी वाहने उभी राहात आहेत. अनधिकृतपणे टॅक्सी व रिक्षा स्टँड सुरू करण्यात आले असून त्यांच्यावर ठोस कारवाई केली जात नसल्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. नवी मुंबईमधील वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे. परंतु अनेक ठिकाणी पोलीस शिस्त लावण्याऐवजी मनमानीपणे दंड आकारणीकडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत.
सायन-पनवेल महामार्गावर वाशी वाहतूक पोलीस चौकीसमोरच नियमांचे उल्लंघन सुरू असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. चौकीसमोर प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटीसाठी विनंती थांबा सुरू करण्यात आला आहे.
येथे फक्त एसटी बसेस उभे राहणे अपेक्षित आहे. परंतु दिवसभर येथे रिक्षा व टॅक्सींचे अतिक्रमण असते. सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत खासगी प्रवासी बसेस अवैध उभी राहतात. याचा फटका एनएमएमटी व राज्य परिवहन उपक्रमास बसत असून प्रतिदिन हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. वाहतूक पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतूक बंद केली तर राज्य परिवहन व महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या प्रवासी संख्येत दुप्पट वाढ होऊन उत्पन्नही वाढू शकते.
वाहतूक चौकीसमोर खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी राहात असल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. येथे अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. पोलीस चौकीसमोरच वाहतूक कोंडी होत असूनही पोलीस ठोस कार्यवाही करत नाहीत.
नागरिकांची नाराजी
वाहतूक पोलीस चौकीसमोरच अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. चौकीसमोरच प्रतिदिन सायंकाळी सहा ते रात्री १२ पर्यंत वाहतूक कोंडी होत असते. खासगी बसेस राज्य परिवहन मंडळाच्या थांब्यावर थांबत असूनही त्यांच्यावर ठोस कारवाई केली जात नसल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.