रेल्वे स्थानकाबाहेर खासगी वाहनांचे अतिक्रमण
By Admin | Updated: March 17, 2017 05:55 IST2017-03-17T05:55:26+5:302017-03-17T05:55:26+5:30
सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानक परिसरात खासगी वाहनांचे अतिक्रमण ही नवी समस्या निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी मेट्रोचे काम सुरू

रेल्वे स्थानकाबाहेर खासगी वाहनांचे अतिक्रमण
नवी मुंबई : सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानक परिसरात खासगी वाहनांचे अतिक्रमण ही नवी समस्या निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्याने प्रवाशांना स्थानकाकडे जाण्याकरिता वाट काढणे मुश्कील होते. एका बाजूने रिक्षाचालकांचा थांबा तर दुसरीकडे ओला, उबेरसारखी खासगी वाहने तळ ठोकून असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रेल्वे स्थानक परिसरातून ओला, उबेर सारख्या खासगी वाहनांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने प्रवाशांच्या प्रतीक्षेत वाहनचालक या ठिकाणी गाड्या उभ्या करत असल्याचा प्रकार पाहायला मिळतो. ऐन कार्यालयीन वेळेत या ठिकाणी प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. या चारचाकी वाहनांनी पदपथावर अतिक्रमण केल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. मेट्रोच्या कामामुळे या ठिकाणी पार्किंगची सोय होत नसल्याने सकाळच्या वेळी या ठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहनांची गर्दी पाहायला मिळते. प्रवाशांची दुचाकी वाहने रेल्वे स्थानक परिसरात उभी केली जात असून महापालिकेच्या वतीने या ठिकाणी ठोस कारवाई केली जात नसल्याची नाराजी रेल्वे कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. स्थानकाच्या आतील बाजूसही बिनधास्तपणे गाड्या उभ्या केल्या जात असून याकडे गांभीर्याने लक्ष घेतले जात नाही. पे अॅण्ड पार्क ऐवजी रेल्वे स्थानक परिसरातच गाड्या उभ्या केल्या जात असल्याने येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांना, रिक्षाचालकांना मार्ग काढणे अवघड होत असल्याची तक्रार येथील रिक्षाचालकांनी केली आहे. (प्रतिनिधी)