माथाडींच्या जागेवर अतिक्रमण
By Admin | Updated: October 11, 2015 00:58 IST2015-10-11T00:58:35+5:302015-10-11T00:58:35+5:30
कोपरखैरणेमध्ये माथाडी कामगारांना मंजूर केलेल्या घरांच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. सुरुवातीला या जागेवर छोटेसे मंदिर उभारले होते. सद्य:स्थितीमध्ये फेरीवाल्यांनीही बस्तान मांडले

माथाडींच्या जागेवर अतिक्रमण
- सूर्यकांत वाघमारे, नवी मुुंबई
कोपरखैरणेमध्ये माथाडी कामगारांना मंजूर केलेल्या घरांच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. सुरुवातीला या जागेवर छोटेसे मंदिर उभारले होते. सद्य:स्थितीमध्ये फेरीवाल्यांनीही बस्तान मांडले असून, कामगार व माथाडी संघटनेने तक्रार करूनही सिडको प्रशासनाने वर्षभरात काहीही कारवाई केलेली नाही.
सिडकोने कष्टकरी माथाडी कामगारांसाठी नेरूळ, तुर्भे, वाशी, ऐरोली, घणसोली व कोपरखैरणेमध्ये अल्पदरामध्ये घरे उपलब्ध करून दिली आहेत. १९९५ ते सन २००० दरम्यान जवळपास अडीच हजार घरे बोगस संस्थेला दिली होती. माथाडी संघटनेचे नेते शशिकांत शिंदे व नरेंद्र पाटील यांनी पाठपुरावा करून या घरांचे वाटप थांबविले होते. त्यानंतर जवळपास १० वर्षांच्या पाठपुराव्यानंतर या घरांचे सिडकोने कामगारांना वाटप सुरू
केले. सेक्टर १ मधील घर क्रमांक ५३ शैलेश भोसले व ५४ हे भिवा उंबरकर यांना मंजूर करण्यात आले होते. घर मिळाल्यामुळे कामगारांना आनंद झाला. परंतु प्रत्यक्षात मंजूर केलेल्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी झाड असल्याचे निदर्शनास आले. दोन्ही कामगारांनी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल युनियनला याविषयी माहिती दिली.
संघटनेने आॅक्टोबर व नोव्हेंबर २०१४ ला सिडको प्रशासनाला पत्र देऊन वृक्ष हटविण्याची मागणी केली होती. परंतु सिडको प्रशसनाने वृक्ष वेळेवर हटविले नाहीत. काही महिन्यांनंतर येथील वृक्षाखाली हनुमानाची मूर्ती बसविण्यात आली. अचानक मूर्ती बसविण्यात आल्यामुळे कामगारांना आपल्याला घरापासून वंचित राहावे लागण्याची भीती वाटू लागली आहे.
यापूर्वी सदर ठिकाणी असलेली देवाची मूर्ती बाजूला ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु याविषयी काही संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण
झाले होते. त्यामुळे मूर्ती पुन्हा
त्याच ठिकाणी ठेवण्यात आली. जवळपास वर्षभरापासून या ठिकाणचे अतिक्रमण वाढत गेले आहे. या भूखंडावर पत्र्याचे शेड उभे करण्यात आले आहे. या शेडमध्ये भाजी, हार, फुले व इतर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणाकडेही सिडको व महापालिका प्रशासन
दुर्लक्ष करीत आहे.
हमालीचे काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या दोन कामगारांना घरापासून वंचित राहावे लागत असून, हा अन्याय दूर करावा अशी मागणी कामगार व त्यांचे कुटुंबीय करीत आहेत. सिडकोेने येथील अतिक्रमण दूर करावे किंवा कामगारांना तत्काळ पर्यायी घरे उपलब्ध करून देण्याची मागणीही केली जात आहे.
सिडकोच्यावतीने मला ५३ क्रमांकाचे घर मंजूर केले होते. परंतु सदर ठिकाणी अतिक्रमण झाले असल्यामुळे गत वर्षभरापासून त्याचा ताबा मिळू शकलेला नाही. सिडको व महापालिका प्रशासनाने योग्य कार्यवाही करून आम्हाला न्याय द्यावा.
- शैलेश भोसले, माथाडी कामगार
घरे मंजूर झाली, परंतु ती ताब्यात मिळाले नाहीत. वर्षभर आम्ही हक्काचे घर मिळावे यासाठी पाठपुरावा करीत आहोत. परंतु अद्याप त्यास यश आलेले नाही. आम्हाला मंजूर केलेल्या जागेवरील अतिक्रमण दूर करावे किंवा तत्काळ पर्यायी घरे मिळवून द्यावीत.
- भिवा उंबरकर, माथाडी कामगार