नियोजनशून्य कारभारामुळे अतिक्रमण, न्यायालयाकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 00:57 IST2020-12-20T00:57:29+5:302020-12-20T00:57:48+5:30
Navi Mumbai : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत अनेक नोडमध्ये नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. त्यात फेरीवाल्यांची व्यापलेले पदपथ व मोकळी मैदाने ही मोठी समस्या बनली आहे.

नियोजनशून्य कारभारामुळे अतिक्रमण, न्यायालयाकडे तक्रार
नवी मुंबई : सिडको व महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे घणसोलीत नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. अशातच भाजी मार्केटसाठी भूखंड राखीव नसल्याने पदपथांवर तसेच मोकळ्या जागेत अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे भेडसावणाऱ्या समस्यांबाबत न्यायालयाकडे तक्रार करण्यात आली आहे.
स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत अनेक नोडमध्ये नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. त्यात फेरीवाल्यांची व्यापलेले पदपथ व मोकळी मैदाने ही मोठी समस्या बनली आहे. शहरातील प्रत्येक नोडमध्ये हे चित्र पाहायला मिळत आहे. त्यात प्रशासनातील काही अधिकारीच पक्षपाती कारवाया करून मर्जीतल्या अनधिकृत फेरीवाल्यांसोबत हितसंबंध जोपासत असल्याची शक्यता वर्तवणारे प्रकार घडत आहेत. घणसोली येथे घडलेल्या अशाच पक्षपाती कारवाईविरोधात न्यायालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. घणसोली सेक्टर १ ते ९ साठी केवळ दोन भूखंड भाजी मार्केटसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी सेक्टर ४ येथील २१६ क्रमांकाच्या भूखंडावर मटण व्यावसायिकांनी अवैध ठाम मांडला आहे. तर सेक्टर ७ येथील भूखंड अद्याप विकसित केलेला नाही. यामुळे ९ पैकी एकही सेक्टरमध्ये अधिकृत भाजी मार्केटसाठी जागा नसल्याने फेरीवाल्यांना रस्ते, पदपथ अथवा मोकळ्या मैदानात बसावे लागत आहे. त्यामुळे अतिक्रमणदेखील वाढत चालले आहे. या परिस्थितीला सिडको व महापालिका अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप तक्रारदार कृष्णा पाटील यांनी केला आहे.
नागरिकांचा संताप
घणसोली नोडमध्ये भाजी मार्केट पुरवण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. मात्र अनधिकृत मटण व्यावसायिकांना थारा देऊन तेढ निर्माण करण्याचे काम अधिकारी करत असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. परिणामी फेरीवाले रस्त्यावर बसत असून नागरिकांना त्यांच्याकडून भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका फेरीवाल्यांसह नागरिकांनाही बसत असल्याचा संताप व्यक्त होतो.