कर्मचाऱ्यांचा असंतोष वाढतोय
By Admin | Updated: July 25, 2016 03:14 IST2016-07-25T03:14:49+5:302016-07-25T03:14:49+5:30
पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक शिस्तीमुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांना कारवाईची भीती वाटू लागली आहे. कामात चूक झाली तर शिक्षेची तरतूद आहे

कर्मचाऱ्यांचा असंतोष वाढतोय
नवी मुंबई : पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक शिस्तीमुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांना कारवाईची भीती वाटू लागली आहे. कामात चूक झाली तर शिक्षेची तरतूद आहे, पण चांगले काम केल्यास प्रोत्साहन देण्याची काहीच व्यवस्था नाही. कार्यक्षमता वाढविण्यासाठीही प्रयत्न होत नाहीत. सिडकोमध्ये संजय भाटीया यांनी राबविलेला पारदर्शी कारभाराचा पॅटर्न पालिकेत राबविण्याची मागणी होऊ लागली आहे.
महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी दोन आठवड्यांत प्रशासनामधील बेशिस्तपणा मोडीत काढला आहे. कर्मचारी वेळेवर कामावर येऊ लागले आहेत. कार्यालयाची वेळ संपल्यानंतरही काम करीत असल्याचे चित्र दिसत आहे. सुटीच्या दिवशीही अनेक कर्मचारी काम करीत आहेत. पालिकेच्या कामकाज पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाला असला तरी कर्मचाऱ्यांवरील कारवाईची टांगती तलवार अद्याप दूर झालेली नाही. कधीही कोणत्याही चुकांसाठी निलंबित किंवा वेतन कपातीची कारवाई होण्याची भीती वाटत आहे.
आयुक्तांच्या दराऱ्यामुळे कोणीही उघडपणे बोलत नसले तरी कर्मचाऱ्यांमध्ये दिवसेंदिवस असंतोष वाढत आहे. अधिकारी व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अॅड. सुरेश ठाकूर यांनी आयुक्तांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेमध्ये प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली जात आहे व येथील अधिकाऱ्यांना योग्य वागणूक दिली जात नसल्याची चर्चा आहे.
चार वर्षांपूर्वी महापालिकेपेक्षाही सिडकोची भ्रष्टाचारासाठी प्रतिमा मलिन झाली होती. सिडको म्हणजे भ्रष्टाचार, असे अनेक जण खासगीत बोलू लागले होते. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी संजय भाटीया यांची नियुक्ती झाल्यानंतर सिडकोमधील भ्रष्टाचार थांबला.
भाटीया यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाचा भार स्वीकारताच यापूर्वी काय झाले मला माहीत नाही, परंतु यापुढे भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसल्याचे सांगितले. निष्काळजी व कामचुकार कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले. मानसिक ताण कमी करण्यासाठी व आरोग्यरक्षणासाठी शिबिरांचे आयोजनही केले होते.