‘नैना’ विरोधात एल्गार
By Admin | Updated: December 21, 2015 01:37 IST2015-12-21T01:37:15+5:302015-12-21T01:37:15+5:30
प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या नैना प्रकल्पाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. शनिवारी सुकापूर येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यात नैनाविरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘नैना’ विरोधात एल्गार
पनवेल : प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या नैना प्रकल्पाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. शनिवारी सुकापूर येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यात नैनाविरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला.
पनवेल तालुक्यातील २३ गावातील नैना प्रकल्प बाधित शेतकरी व प्रकल्पग्रस्तांनी नवीन पनवेल येथे जाहीर मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना श्रमिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळाराम भोईर यांनी मार्गदर्शन केले. रायगड जिल्ह्याने इतिहास घडविला आहे. त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची वेळ आज पनवेल तालुक्यातील २३ गावातील नैना प्रकल्पबाधित शेतकऱ्यांवर आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी राजकीय पक्षाच्या पादुका बाहेर ठेवत गांधीजींच्या आंदोलनाची कास धरणे गरजेचे असल्याचे मत भोईर यांनी व्यक्त केले. राज्य श्रमिक संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील श्रमिक संघटना खंबीरपणे येथील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास भोईर यांनी व्यक्त करीत आंदोलनासाठी सज्ज व्हा, असे आवाहन केले. नैना प्रकल्पासाठी एकही इंच जमीन न देण्याचा निर्धार व्यक्त करीत आंदोलनासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शेतकऱ्यांना प्रभाकर गांधी यांनी केले. (प्रतिनिधी)