‘एलिफंटा’ परिसरातील तडे वाढले
By Admin | Updated: August 10, 2016 03:22 IST2016-08-10T03:22:43+5:302016-08-10T03:22:43+5:30
एलिफंटा लेणी परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात वाढ झाली असून जमिनीला तडे जाण्याचे प्रमाण ५५ मीटरपर्यंत पोहोचले आहे

‘एलिफंटा’ परिसरातील तडे वाढले
उरण : एलिफंटा लेणी परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात वाढ झाली असून जमिनीला तडे जाण्याचे प्रमाण ५५ मीटरपर्यंत पोहोचले आहे. बुधवारी पुरातत्व आणि उरण महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी एलिफंटा पर्यटन स्थळाची संयुक्तपणे पाहणी केली. या पाहणीत तडे जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती महसूल विभागाचे अधिकारी गणपत शिंगाडे यांनी दिली. लेण्यांलगत असलेल्या भुसभुसीत मातीमुळे भूस्खलन होत असून भविष्यात लेणी परिसराची हानी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार आहेत. यासाठी लेणी परिसराचा हायड्रोलिक सर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती एलिफंटा केव्हजचे केअरटेकर कैलास शिंदे यांनी दिली.
मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे जगप्रसिद्ध एलिफंटा केव्हज परिसरालगत जमिनीला तडे गेले आहेत. त्यामुळे संरक्षक भिंत कोसळण्याची भीती निर्माण झाल्याने शिवसेना उपविभाग प्रमुख आणि घारापुरी ग्रामपंचायत सदस्य बळीराम ठाकूर यांनी उरण तहसीलदारांसह पुरातत्व विभागाकडे तक्रार करून पर्यटन क्षेत्रात अपघातासारखी घटना घडण्याआधीच तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली होती. बळीराम ठाकूर यांच्या तक्रारीची दखल घेवून पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी एलिफंटा लेणी परिसराकडे धाव घेवून मंगळवारी (९ आॅगस्ट) पाहणी केली होती. त्यानंतर बुधवारीही पुरातत्व आणि उरण महसूल विभागाचे गणपत शिंगाडे, मंडल अधिकारी गणपत ठाकूर, तलाठी दिनकर पवार आदि अधिकाऱ्यांनी एलिफंटा पर्यटन स्थळाची संयुक्तपणे पाहणी केली. या पाहणीत तडे जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती महसूल विभागाचे अधिकारी गणपत शिंगाडे यांनी दिली. भूस्खलनामुळे लेणीलगत संरक्षक भिंत परिसरातील जमिनीला कालच्या २५ मीटरवरून ५५ मीटर लांबीपर्यंत तडे गेले आहेत. याबाबत पंचनामा करण्यात आला असून हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाचे अधिकारी गणपत शिंगाडे यांनी दिली. (वार्ताहर)