दोन कामगार ट्रस्टी पदासाठी जेएनपीटीत ११ फेब्रुवारीला निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 23:31 IST2020-01-14T23:30:09+5:302020-01-14T23:31:00+5:30
जेएनपीटी ट्रस्टीची एकूण संख्या १९ आहे. त्यापैकी १७ ट्रस्टी सरकार नियुक्त असतात. उर्वरित दोन ट्रस्टींची निवड कामगारांचे गुप्त मतदान घेऊन केली जाते.

दोन कामगार ट्रस्टी पदासाठी जेएनपीटीत ११ फेब्रुवारीला निवडणूक
उरण : जेएनपीटीच्या दोन कामगार ट्रस्टी पदासाठी ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. केंद्रीय कामगार उपायुक्तांनी मंगळवार, १४ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीनंतर निवडणुकीची अधिकृत घोषणा केली आहे.
जेएनपीटी ट्रस्टीची एकूण संख्या १९ आहे. त्यापैकी १७ ट्रस्टी सरकार नियुक्त असतात. उर्वरित दोन ट्रस्टींची निवड कामगारांचे गुप्त मतदान घेऊन केली जाते. दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड केली जाते. मागील निवडणुकीत जेएनपीटी कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष दिनेश पाटील आणि जेएनपीटी वर्कर्स युनियनचे सरचिटणीस रवींद्र पाटील हे दोन कामगार ट्रस्टी अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवून ट्रस्टीपदी विराजमान झाले होते. सलग चार वेळा ट्रस्टीपद भूषविणारी न्हावा-शेवा बंदर (अंतर्गत) संघटना मागील ट्रस्टींच्या निवडणुकीत तिसºया क्रमांकावर फेकली गेली होती. त्यामुळे ही संघटना जेएनपीटीच्या मान्यता प्राप्त कामगार संघटनेच्या यादीतूनही बाहेर फेकली गेली होती.
त्यामुळे जेएनपीटी कामगार ट्रस्टीची निवडणूक जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत बंदरातील सर्वच कामगार संघटना होत्या, तर विविध कामगार संघटनेने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच निवडणुकीच्या पूर्व तयारी सुरू केली होती. कामगारांना आकर्षित करण्यासाठी विविध कामगार संघटनांकडून शक्ती प्रदर्शन, आंदोलन करण्यात येत होती. आता ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे सर्वच कामगार संघटना अधिकृत प्रचाराला लागणार आहेत.