सिडको वसाहतीत लवकरच ई - टॉयलेट
By Admin | Updated: June 1, 2016 03:01 IST2016-06-01T03:01:58+5:302016-06-01T03:01:58+5:30
स्वच्छ भारत अभियानानंतर सिडको प्रशासनही बऱ्यापैकी जागृत झाली आहे. सिडको वसाहतीत सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याबरोबर ई- टॉयलेट संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे

सिडको वसाहतीत लवकरच ई - टॉयलेट
कळंबोली : स्वच्छ भारत अभियानानंतर सिडको प्रशासनही बऱ्यापैकी जागृत झाली आहे. सिडको वसाहतीत सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याबरोबर ई- टॉयलेट संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कळंबोली आणि कामोठे वसाहतीबरोबर सायन-पनवेल महामार्गावर प्रवाशांकरिता ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लवकरच निविदा प्रसिद्ध करून त्यानंतर त्वरित ई -टॉयलेट बसविण्यात येतील, अशी माहिती सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सिडको नोडचा विकास झाल्याने दिवसेंदिवस येथील लोकसंख्या वाढत आहे, विशेषकरून वसाहतींमध्ये रस्ते, पाणी, गटार या सुविधा पुरविण्यात आल्या असल्या तरी सार्वजनिक स्वच्छतागृह आणि शौचालयाची बोंब आहे. वारंवार पाठपुरावा करूनही सिडको नोडमध्ये स्वच्छतागृह आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. याबाबत नवीन पनवेल येथे राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलन करावे लागले. राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते आनंद भंडारी यांनी तर उपोषण सुद्धा केले. इतर राजकीय पक्षांनी अर्ज आणि विनंत्या सुध्दा केल्या तरी याबाबत कार्यवाही झाली नाही. कळंबोली आणि कामोठे वसाहतीतील परिस्थिती फारशी वेगळी नाही. परंतु राज्य व केंद्र शासनाने हाती घेतलेले स्वच्छता अभियानात सिडकोने प्रभावीपणे काम करण्याचा निर्णय घेतला. कळंबोली आणि कामोठे नोडची जबाबदारी असलेले अधीक्षक अभियंता किरण फणसे यांनी सुध्दा सार्वजनिक शौचालयाची गरज असल्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला.
या दोनही नोडमधील स्वच्छतेवर सिडकोचे गेल्या एक दीड वर्षापासून विशेष लक्ष आहे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण आणि अतिरिक्त मुख्य अभियंता बिजेश शर्मा या अधिकाऱ्यांनी ई-टॉयलेट ही राबविण्याकरिता पुढाकार घेतला. त्यानुसार कळंबोली आणि कामोठे वसाहतीतील नागरिकांकरिता ई टॉयलेट बसविण्यात येणार आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर हा उपक्र म हाती घेण्यात आला आहे. दोन ही वसाहतीत पादचारी, फेरीवाली, रिक्षावाले, त्याचबरोबर दिवसभर रस्त्यावर काम करणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यांना शौचालयाची व्यवस्था नसल्याने मोठी कुंचबणा होत होती. सात ई-टॉयलेट उभारणार
कळंबोली आणि कामोठे वसाहतीत प्रत्येकी दोन म्हणजे चार टॉयलेट उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी एक कळंबोली सिडको कार्यालयात बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर पनवेल-सायन महामार्गावर कळंबोली आणि कामोठे येथील बसथांब्यालगत टॉयलेट बांधण्यात येणार आहे. याकरिता ५०.३६ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. निविदा पध्दतीने एजन्सीने नियुक्त करण्यात येणार आहे.