‘इप्का’चे सांडपाणी थेट नाल्यात

By Admin | Updated: May 31, 2016 03:12 IST2016-05-31T03:12:16+5:302016-05-31T03:12:16+5:30

महाड औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या आजही छुप्या पद्धतीने प्रक्रिया न करताच सांडपाणी थेट नाल्यात सोडण्याचे काम करत आहेत

The effluent of 'Ipca' directly in the Nallah | ‘इप्का’चे सांडपाणी थेट नाल्यात

‘इप्का’चे सांडपाणी थेट नाल्यात

दासगांव : महाड औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या आजही छुप्या पद्धतीने प्रक्रिया न करताच सांडपाणी थेट नाल्यात सोडण्याचे काम करत आहेत. अशाच प्रकारे येथील इप्का लॅबोरेटरीज या फार्मास्युटिकल कंपनीने आपले सांडपाणी थेट शेजारच्या नाल्यात सोडले आहे. हायड्रंट टेस्ट करताना हे पाणी बाहेर गेल्याचे कंपनीचे म्हणणे असले तरी अशाच प्रकारे नाल्यात पाणी सोडल्याची ही घटना काही नवीन नाही. वर्षभरातून अनेकदा अशा छुप्या पद्धतीने इप्का कंपनी नाल्यात सांडपाणी सोडते असा परिसरातील नागरिकांचा आरोप आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाची समस्या गेली अनेक वर्षे कायम आहे. महाड औद्योगिक वसाहतीचे पूर्वीचे रूप आणि आजचे स्वरूप यात बराच बदल झाला असला तरी अनेक छोट्या कंपन्या आपले पाणी आजही थेट नाल्यात किंवा कारखान्याशेजारच्या गटारात सोडत आहेत. पावसाळ्यात तर हा प्रकार सर्रास होतो. महाड औद्योगिक वसाहतीमधील इप्का लॅबोरेटरीज या कंपनीच्या शेजारील कोरड्या नाल्यात काही दिवसांपासून लाल, निळ्या रंगाचे पाणी दिसू लागले आहे. रसायनमिश्रित हे पाणी डबक्यात साचले असले तरी पहिल्याच पावसात हे घातक सांडपाणी थेट नदीला जावून मिळणार आहे. याचा त्रास जलचर प्राणी आणि माणसाला होणार आहे. मात्र याचे काही एक सोयरसुतक कंपनींना नाही.
इप्का कारखान्याच्या मागील नाल्यात सांडपाणी सोडण्याचा काही नवा प्रकार नसून प्रतिवर्षी कंपनी या ना त्या कारणाने या नाल्यात पाणी सोडून देण्याचे काम करतच आली आहे. यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील कंपनीला दोन नोटिसा बजावल्या आहेत. मात्र नोटिसीव्यतिरिक्त कोणतीच कारवाई होत नसल्याने कंपनीने पुन्हा अशाच प्रकारे पाणी सोडण्याचा उपद्व्याप सुरू केला आहे. आज चोरी पकडली गेल्यानंतर कंपनी सुरक्षा अधिकाऱ्यांनी हायड्रंट टेस्टकरिता पाणी सोडल्याचे कबूल केले आहे. यामुळे कंपनीने आपली चुकी अप्रत्यक्षरीत्या मान्य केली आहे. (वार्ताहर)

Web Title: The effluent of 'Ipca' directly in the Nallah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.