ईस्टर्न फ्री वेवर सीसीटीव्हीचा वॉच
By Admin | Updated: June 17, 2014 02:01 IST2014-06-17T02:01:31+5:302014-06-17T02:01:31+5:30
पूर्व मुक्त मार्गामुळे (ईस्टर्न फ्री वे) मुंबईकरांचा प्रवास जलद झाला़ मात्र, हा मार्ग मोकळा असल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण नाही़

ईस्टर्न फ्री वेवर सीसीटीव्हीचा वॉच
मुंबई : पूर्व मुक्त मार्गामुळे (ईस्टर्न फ्री वे) मुंबईकरांचा प्रवास जलद झाला़ मात्र, हा मार्ग मोकळा असल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण नाही़ त्यात अपघातांचा धोका वाढल्यामुळे पी़ डिमेलो जंक्शनपासून पांजरपोळ जंक्शनपर्यंत आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहे. तसेच नंबरप्लेट ओळखण्यासाठी स्वयंचलित कॅमेरे बसवून एक प्रकारे वाहनांच्या वेगाला बे्रक लावण्यात येणार आहे़
मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्व मुक्त मार्गाचा उतारा आणला़ मात्र, या मार्गावरून भरधाव वेगाने वाहनांची ये-जा सुरू असल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे, अपघात टाळणे तसेच वाहतुकीचे नियमन करण्याचे आव्हान उभे राहिले आहे़ त्यामुळे या मार्गावर १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला़
यासाठी एमएमआरडीएकडून महापालिकेला नुकताच निधी देण्यात आला आहे़ त्यानुसार, पी़ डिमेलो जंक्शन ते पांजरपोळ जंक्शनपर्यंत १३़५९ किलोमीटर अंतरासाठी आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील़ यासाठी ६० लाख ८० हजार रुपये तरतूद करण्यात आली आहे़ स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे़ तूर्तास महत्त्वाच्या वळणावर हे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत़ (प्रतिनिधी)