मोगऱ्यातून वर्षाला ६ लाखांची कमाई
By Admin | Updated: September 30, 2015 00:06 IST2015-09-30T00:06:44+5:302015-09-30T00:06:44+5:30
शहापूर तालुक्यातील नेवरे बराडपाडा येथील आदीवासी शेतकरी कैलास राघो बराड यांनी दोन एकर शेतीत मोगऱ्याची लागवड करून वार्षिक ६ लाख रुपये मिळविले आहेत.

मोगऱ्यातून वर्षाला ६ लाखांची कमाई
जनार्दन भेरे, भातसानगर
त्यांच्यासह मुलांना ना नोकरी ना परवडणारा पुढला व्यवसाय. केवळ दिवसभर जंगलात फिरायचे असा त्यांचा दिनक्रम होता. मात्र आपल्या जागेत आपण फुलझाडे लावली तर ....अशी कल्पना त्यांच्या मनात मात्र सतत रहायची. ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ते भिवंडी येथे रंगरंगोटीचे काम करण्यासाठी एक महिना गेले. दिवसरात्र काम करून २० हजार रुपये महिना मिळविल्यानंतर त्यांनी मोगऱ्याची ३ हजार रोपे खरेदी केली. हाकेच्या अंतरावरील तानसा नदीचे पाणी शेतात घेण्यासाठी पंचायत समिती, शहापूर येथील कृषी विभाग गाठून तेथील कृषी अधिकारी एस.मंगाळे, विलास झुंजारराव, सचिन गंगावणे, पूनम कान यांनी त्या शेतकऱ्यांना सर्वतोपरीने मदत करून आदिवासी उपयोजनेतून इंजिन, पाईप, स्प्रेपंप फवारणी औषधे व मार्गदर्शन केले. अहोरात्र मेहनत करून आज प्रतीदिवशी ३० किलो मोगरा विक्रीसाठी जातो. प्रतिकिलोस १८०० ते २ हजार रुपये भाव मिळाल्याचे बराड यांनी सांगितले.
वर्षभरातून केवळ जुलै महिन्यात फांद्या कटींग होत असल्याने फुलांचे उत्पादन घेत नाही. अन्यत्र वर्षभर देणारे उत्पादन असल्याने आता नोकरीची आवश्यकता नसल्याचे हे कुटुंब सांगते. त्यांना या व्यवसायात त्यांची पत्नी गुलाब, मुले दशरथ, संजय, मुलगी संगिता मदत करतात. त्यामुळे उत्पन्न घेण्याची उमेद त्यांच्या दुपटीने वाढली आहे. रोपवाटीका तयार करून २० ते २५ हजार रुपये इतके उत्पन्नही ते दरवर्षी मिळवितात.