ई-कचराविषयक जाणीवजागृती मोहीम सुरू
By Admin | Updated: December 23, 2015 00:41 IST2015-12-23T00:41:15+5:302015-12-23T00:41:15+5:30
स्त्रीमुक्ती संघटना व नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने कचरावेचक महिलांकरिता कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे

ई-कचराविषयक जाणीवजागृती मोहीम सुरू
नवी मुंबई : स्त्रीमुक्ती संघटना व नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने कचरावेचक महिलांकरिता कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे, ई-कचरा म्हणजे काय तसेच कचऱ्याचे व्यस्थापन याविषयी विविध पातळींवर मार्गदर्शन करण्यात आले. या जाणीवजागृती मोहिमेंतर्गत दिघा, रबाळे, इंदिरानगर, सारसोळे, जासई, उलवे येथील कचरावेचक महिलांमध्ये जागृती करण्यात आली. वाशी, घणसोली, महापे, बोनसरी, डम्पिंग ग्राउंड अशा विविध ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्त्रीमुक्ती संघटनेच्या नवी मुंबईच्या समन्वयक वृषाली मगदूम, ईटीसी केंद्राच्या संचालक वर्षा भगत यांनी या महिलांना मार्गदर्शन केले. या महिलांना महानगरपालिकेचे कचरा व्यवस्थापन, पाणी, शौचालय यासंदर्भातील कामांची माहिती या ठिकाणी देण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी कचऱ्यापासून खतनिर्मिती झाली तर प्रदूषणाची समस्या सुटते, अशी माहिती दिली. संघटनेच्या कार्यकर्त्या रश्मी जोशी स्त्रीमुक्ती संघटनेच्या माध्यमातून १२ महाविद्यालये, शाळा आणि गृहनिर्माण सोसायटी, वस्तींमधून जाणीवजागृती मोहीम राबविली जात आहे. या माध्यमातून सहा महिन्यांमध्ये सहा हजार किलो ई-कचरा संकलित केला आहे. कल्पना अंधारे, विजया सुर्वे, आशा गायकवाड, सीमा किसवे, ईटीसी केंद्राचे विशेष सहकार्य लाभले आहे. (प्रतिनिधी)