दप्तराचे वजन तपासण्याचे आदेश

By Admin | Updated: October 12, 2015 04:29 IST2015-10-12T04:29:06+5:302015-10-12T04:29:06+5:30

चालू शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या.

Duplicate weight check order | दप्तराचे वजन तपासण्याचे आदेश

दप्तराचे वजन तपासण्याचे आदेश

ठाणे : चालू शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार, नुकतीच अचानक पुण्यातील एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केल्यावर त्याचे वजन जास्त असल्याचे उघडकीस आले. त्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातीलदेखील सर्व शाळांमध्ये दप्तराचे ओझे तपासण्याचे आदेश ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पुन्हा दिले आहेत.
राज्यातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे अधिक असल्याने त्यांना भविष्यात पाठीचा त्रास, सांधे दुखणे, मणक्यांची झीज होणे, मान दुखणे, डोकेदुखी यासारखे आजार उद्भवतात. या बाबींचा गांभीर्याने विचार करून शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने जुलै २०१५ मध्ये शासन निर्णय काढून दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सर्व शाळांना सूचना दिल्या होत्या. यामध्ये दप्तराचे ओझे हे विद्यार्थ्यांच्या वजनाच्या १० टक्कयांपेक्षा जास्त असू नये, असे म्हटले आहे. त्यातच, नुकत्याच पुण्यातील एका शाळेमध्ये शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन तपासले, त्या वेळी ते अधिक असल्याचे समोर आले. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे अधिक असू नये म्हणून ते तपासण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश प्रामुख्याने विभागातील उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षक आदी यंत्रणेला दिले आहेत. त्यांनी किमान पाच शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन दप्तराचे ओझे तपासण्यास सांगितले. तसेच त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी मीना यादव-शेंडकर यांनी दिली.

Web Title: Duplicate weight check order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.